Chakan :  रक्तदान शिबिराला प्रतिसाद; 72 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Response to blood donation camp; Blood donation by 72 blood donors

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात  72 जणांनी रक्तदान केले.  यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी 72 युनिट रक्त संकलन केले. चाकण येथे रविवारी हे शिबिर पार पडले.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे शहरात रक्त मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तपेढीत अथवा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढयांनी केले आहे.

अन्न-औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केला असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे.

या परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे चाकण या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच  सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात आले.

जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा निरंकारी मिशन सेवेसाठी तत्पर असते.  सध्य परिस्थितीमध्ये निरंकारी मिशनद्वारे पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना राशन वाटप करण्यात आले.

गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धाऊन गेले होते.

चाकण शाखेचे प्रमुख मधुकर गोसावी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.  हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चॅरिटेबल, सेवादलच्या सर्व स्वयंसेवकांचे मोठे योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.