Chakan : इन्ड्युरन्स कंपनीच्या कामगारांना 14 हजारांची भरघोस पगारवाढ

माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांची मध्यस्थी यशस्वी

एमपीसी न्यूज- चाकण येथील इन्ड्युरन्स टेक्नाॅलाॅजिस लिमिटेड (अॅलाॅयव्हिल डिव्हिजन )या टु व्हीलर गाडीचे चाक उत्पादन करणाऱ्या नामवंत कंपनीतील कामगारांना मासिक 14 हजार रुपये इतकी भरघोस पगारवाढ मिळाली आहे. या पगारवाढीसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली. त्यामुळे नव्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हा करार 45 महिन्यांचा असून तो 1 जून 2018 पासून लागू होत आहे. पगारवाढीच्या बरोबरच भविष्यनिर्वाह निधी, भरपगारी यामध्ये वाढ होत असल्याने अप्रत्यक्षपणे ही पगारवाढ 17 हजार रुपयांवर जाईल, असे युनियनने म्हटले आहे. कामगारांना आता पगारात प्रत्यक्षात 13 हजार 300 रुपये मिळणार असून 700 रुपये हे उत्पादन निगडीत राहणार आहेत. या नवीन पगारवाढीच्या करारामुळे कामगारांचा मासिक पगार 32 ते 38 हजार होईल .बोनस कायद्यानुसार दरवर्षी प्रत्येकी 23 हजार 500 रुपयांपासून 24 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळेल.

या करारावर युनियनच्या वतीने अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, सेक्रेटरी संजय कदम, मार्गदर्शक बबनराव भेगडे, संदीप गाडे व युनिट अध्यक्ष मोहन पुसदकर, जनरल सेक्रेटरी निलेश शिंदे, रवी काळे, प्रकाश माळी, अभिषेक फुटक, विनोद तिवारी यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विभागाचे प्रमुख आर.एच. मार्लापल्ले, उपाध्यक्ष एस. एन. महाजन, आर.आर.कुलकर्णी, उत्पादन प्रमुख विवेक जोशी, प्रकल्प अधिकारी ए.एच.पाटील , रिजनल हेड धीरज जाधव, सुनील पाटे, विनोद काकडे, वैशाली खरे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या.

एक वर्षापूर्वी ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती पण सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेने या कंपनीत पाऊल टाकले. सेक्रेटरी संजय कदम आणि सर्व कमिटी सदस्यांनी अध्यक्षांचा उत्पादन वाढीचा स्तोत्र कंपनीत राबविला. सर्व कामगारांनी उत्पादन वाढीत झोकुन दिले आणि व्यवस्थापनाने सहकार्याचा हात दिला. परिणामी ही कंपनी तोट्यातुन बाहेर पडली. त्यातूनच चांगल्या पगारवाढीचा करार घडून आला आहे. कामगारांच्या कष्टाचा मोबदला युनियनने भरघोस पगारवाढीने दिलेला आहे. त्यामुळे नव्या कराराचे सर्वत्र उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.