Chakan : धक्कादायक! चाकणमधील एका कंपनीत 120 जण कोरोना पॉझिटिव्ह

या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. : Shocking! 120 positive in a company in Chakan

0

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यात आता कंपनी कनेक्शनमधून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, चाकणमधील एका कंपनीत 120  जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यात आधी पुणे आणि मुंबई या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहावयास मिळत होते. त्यानंतर आता एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे कंपनी कनेक्शनचा धोका आत तालुक्याला सतावू लागला आहे.

कामगारांकडून त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कंपन्यांमध्ये खेड तालुक्याच्या बाहेरचेही कामगार येत असून त्यांची गणना तालुक्यात होत नसल्याने या धोक्याची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र, आता एकाच कंपनीत एकाच दिवशी 120 जण बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.

यातील 60  ते  70  जण तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खेड तालुक्यात आणि त्यातही चाकण परिसरात गेल्या आठवड्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे, ती कंपनी कनेक्शन मधूनच वाढत आहे.

उद्योग चालू ठेवायचे मात्र कोरोनाही पसरू द्यायचा नाही, असे दुहेरी आव्हान कंपनी व्यवस्थापन आणि तालुका प्रशासनापुढे आहे.

दरम्यान आज ( शनिवारी) सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी संबंधित कंपनीला भेट दिली, माहिती घेतली आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली.

गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक घटना व्यवस्थापक या अधिकाराने कंपनी बंद करण्यास सांगितले आहे. कंपनीतील 800 लोकांची स्वॅब तपासणी केली होती, त्यातून 120 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कंपनीने नियमांचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून चौकशी करून कारवाई केली जाईल, असे खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like