Chakan : आगरवाडीत कचरा प्रकल्पास जोरदार विरोध; काम पाडले बंद

अधिकारी-ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी

एमपीसी न्यूज – चाकण शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने त्या-त्या प्रभागांमध्ये जिरवण्याचा चाकण नगरपरिषदेचा प्रयत्न जोरदार विरोध आणि वादावादीमध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या जवळ कचरा विघटन प्रकल्प सुरु करण्यास गेलेल्या नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचा-यां स्थानिक ग्रामस्थांच्या जोरदार विरोधाचा सामना करावा लागल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी घडला. यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांकडे जोरदार हमरीतुमरी झाली. अखेरीस नागरिकांचा प्रचंड विरोध पाहून अधिकारी आणि कर्मचार्यांनी येथून काढता पाय घेतला.

चाकण शहरात दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा तयार होत असून हा कचरा सध्या आंबेठाण रस्त्यावरील खाणीत टाकण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीरस्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे शहराच्या विविध प्रभागातील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागा निश्चित करून लहान-लहान कचरा विघटन प्रकल्प सुरु करण्यास आयुक्तालयाने नगरपरिषदेस मान्यता दिली आहे. त्यानंतर नगरपरिषदेने चाकण शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या दहा जागा निश्चित करून त्या-त्या भागातील कचरा त्याच परिसरात जिरवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

त्यासाठी चाकण नगरपरिषद हद्दीतील आगरवाडी येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील जागेत कचरा जिरविण्याचा लहान प्रकल्प सुरु करण्यासाठी गेलेल्या कर्मचा-यांना स्थानिकांनी काम करण्यास मज्जाव केला. घटनास्थळी पोहचलेल्या  चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांच्याशी स्थानिक ग्रामस्थांची जोरदार वादावादी झाली. संबंधित कचरा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. पाटील यांच्याशी जोरदार वाद घातला. कचरा संकलन आणि विघटन प्रकल्पासाठी शासनाचे अनुदान मंजूर असून अशा पद्धतीने गैरसमज करून घेऊन विरोध झाल्यास निधी परत जाईल असे मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी स्थानिक नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काहीही झाले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे कचरा जिरवण्याचा कसलाही प्रकल्प होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिक राजेश जाधव, संदीप जाधव, किरण कौटकर, मंगेश जाधव, सुभाष आगरकर, अरुण जाधव,सुभाष जंबूकर आदींनी घेतला. आगरवाडी जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत, स्व. शिवाजीराव जाधव फौंडेशनच्या वतीने कचरा प्रकल्प करू नये असे पत्र नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.

दरम्यान, कचरा स्थानिक भागातच जिरवण्याच्या प्रकल्पास स्थानिक नागरिकांनी विरोध सुरु केल्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकू लागला असून चाकण शहरातील सर्व हाउसिंग सोसायट्यांना ओला कचरा स्वत:च जिरवण्यायासाठी सक्त सूचना नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी विरोध करू नये: डॉ. नीलम पाटील (मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद)
चाकण शहराच्या कच-याचा प्रश्न भविष्यात बिकट होऊ नये यासाठी शहरातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी ओला कचरा जिरवण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. शासकीय पथकाने शहरात नुकतीच पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांकडून गैरसमजातून विरोध होत असून अशा प्रकल्पाच्या मुळे कसलेही आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.