Chakan : काळूस येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जमीन खरेदी करण्याकरता माहेराहून पैसे आणावेत आणि पत्नीच्या माहेरची तिच्या वाट्याला येत असलेली एक एकर जमीन पतीच्या नावे करून द्यावी, या मागणीसाठी गेल्या एक वर्षापासून सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या जाचहाट आणि छळास कंटाळून काळूस (ता. खेड, जि.पुणे) येथे विहिरीत उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली नितीन पोटवडे ( वय – २६ वर्षे, रा. पोटवडे वस्ती, काळूस, ता. खेड) असे विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील मच्छिंद्र यशवंत बुट्टे (वय – ५७ वर्षे, रा. वराळे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुट्टे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी वैशालीचा पती नितीन संभाजी पोटवडे ( वय – ३० वर्षे, रा. पोटवडे वस्ती, काळूस, ता. खेड ) याला गुरुवारी (दि.२२) अटक करण्यात आली आहे. तर, सासू मंदाबाई संभाजी पोटवडे (रा. काळूस, ता. खेड) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, सासरी नांदत असताना गेल्या एक वर्षापासून पती नितीन पोटवडे आणि सासू मंदाबाई हे दोघे वैशाली हिस जमीन खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, यासाठी छळ करत होते. त्यामुळे वैशाली हिचे वडील बुट्टे यांनी यापोटी त्यांना एक लाख रुपये दिले होते. मात्र, वैशाली हिला तिच्या माहेरी वराळे येथे वाट्याला येत असलेली एक एकर जमीन पती नितीन याच्या नावावर करून द्यावी, याकरिता ते दोघे तिला संगनमताने शिवीगाळ, दमदाटी करून बेदम मारहाण करत होते.

सततच्या छळाला कंटाळून काळूस (ता. खेड) येथील देवराम हैबती पोटवडे यांच्या विहिरीतील पाण्यात वैशाली उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद संबधित विवाहितेचे वडील बुट्टे यांनी दिली असून त्यानुसार चाकण पोलिसांनी पती नितीन पोटवडे व सासू मंदाबाई यांच्यावर गुन्हा दाखल केला. नितीन पोटवडे याला अटक करण्यात आली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली री याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.