Chakan : संपूर्ण गावानेच दिली कामाची पावती ; सुंदराबाई लष्करे बिनविरोध सरपंच

एमपीसी न्यूज- गावासाठी जे लोक झटतात, पदरमोड करून गावाचा कायापालट करण्यात ज्यांचे योगदान आहे अशा लोकांची दखल संपूर्ण गाव एकोप्याने घेतो. त्यांना गावाचा कारभार पाहण्यासाठी अविरोध संधी देतात, याची प्रचिती कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच निवडीतून आली आहे.  कडाचीवाडी ( ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुंदराबाई पांडुरंग लष्करे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे गावातून जोरदार स्वागत होत आहे.

लष्करे कुटुंबाचे गावासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या जागेवर त्यांना काम करण्याची संधी संपूर्ण गावाने एकजुटीने दिली आहे. निवडीनंतर नूतन सरपंच लष्करे यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार व सरपंचपदाच्या काळात चांगले योगदान देऊ, गावासाठी पाणीपुरवठा योजना राबवू असे मत मांडले आहे.

लष्करे कुटुंबाचे गावासाठी असलेले योगदान पाहून ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. नूतन सरपंच लष्करे यांचे पती पांडुरंग लष्करे याच ग्रामपंचायतीचे सलग दोनदा सदस्य व उपसरपंच होते. लष्करे कुटुंबाने गावासाठी स्वखर्चातून बोअरवेल, बंदिस्त गटारे, गावातील जिल्हापरिषद प्रशालेसाठी व्यासपीठ, स्वागत कमान बांधून दिल्या आहेत. दरम्यान या ग्रामपंचायतीवर यंदा माजी उपसरपंच बाळासाहेब कड, सपना कड, निर्मला कड, सोनल कोतवाल, रुपाली खांडेभराड, महादेव बुचुटे, राजाराम ठाकर, मनोज खांडेभराड, प्रियांका कड यांची वर्णी लागली आहे. संपूर्ण गावात एकजुटीने विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बाळासाहेब कड व सर्व नूतन सदस्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.