Chakan: मेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा; रिपब्लिकन पक्षाची मागणी

चाकण पोलीस ठाण्यावर मोर्चा; मातंग समाजाच्या झोंबाडे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार मागासवर्गीय दाम्पत्याचे पैसे लाटून त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करून हल्ला करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.२०) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करीत पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

ग्रामपंचायतीचा कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ठेकेदार प्रियांका शिवाजी झोंबाडे (वय २२, रा. रा. कुरूळी, ता. खेड) बँकेत जमा झालेली रक्कम अधिक पैसे देण्याच्या आमिषाने काढून माजी सरपंच मेदनकर यांनी काढून घेतली. पैशांची मागणी करणाऱ्या संबंधित ठेकेदार महिलेला अत्यंत आक्षेपार्ह मागणी करत आणि लाकडी दांडक्याने संबंधित महिलेला व तिच्या पतीला मारहाण करण्यात आली होती. या काँट्रक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास मुरलीधर मेदनकर आणि संकेत रामदास मेदनकर (दोघेही रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांच्यावर भादंवि क ४२०, ३२३,५०४, ५०६, ५०९ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

  • त्यानंतर तत्काळ माजी सरपंच रामदास मेदनकर यांनीही कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या झोंबाडे दांपत्याच्या विरोधात खंडणीची मागणी केल्याची तक्रार दिली. त्यानुसार प्रियांका शिवाजी झोंबाडे आणि तिचे पती शिवाजी रोहीदास झोंबाडे (सध्या रा, मेदनकरवाडी, ता.खेड) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३८५,५०४,५०६, ३४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, वारंवार आम्ही केलेल्या कामाच्या करारात ठरलेले पैसे मागितल्याने माजी सरपंचानी दिलेली खंडणीची तक्रार धादांत खोटी असल्याचा झोंबाडे दाम्पत्याचा आरोप आहे. पोलिसांनी चार महिने तक्रार घेतली नाही.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात गेल्यानंतर तक्रार घेतली. मात्र, त्याच दिवशी रात्री माजी सरपंच मेदनकर यांचीही खोटी तक्रार घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि पिडीत दांपत्याने केला आहे.

  • रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरीश देखणे, तालुकाध्यक्ष संतोष डोळस, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव आदींनी मेदनकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले आहे. यावेळी चाकण न.प.चे नगरसेवक राहुल कांडगे, सचिन वाघमारे, अनिल मोरे, संदेश साळवे, नितीन गायकवाड, संतोष जाधव, राहुल गोतारणे, सुरेश गायकवाड, सतीश आगळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

दरम्यान, झोंबाडे दांपत्याला रामदास मेदनकर व त्यांचे कार्यकर्ते नानाविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न होत असून या कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

  • भीमशक्तीची कारवाईची मागणी
    झोंबाडे दाम्पत्यावर अन्याय होत असून पोलीस प्रशासनाने या मध्ये संबंधित मातंग समाजाच्या दांपत्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेने केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन चाकण पोलिसांना दिले आहे. यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस, अनिल जाधव व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.