BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकणच्या बाजार करवसुलीत आढळली अनियमितता

बाजार वाढला, पण वसुली दहा लाखांवरून अडीच लाखांवर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- चाकण नगरपरिषदेची बाजार करवसुली संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. दिवसेंदिवस चाकण मधील बाजार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना बाजार करवसुली चक्क दहा लाखांवरून अवघ्या अडीच लाख रुपयांपर्यंत खाली आली आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात असून या बाबत सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई होणार काय ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

6 एप्रिल 2015 रोजी तत्कालीन चाकण ग्रामपंचायतीचे नवनिर्मित नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाले. नगरपरिषद निर्मितीनंतर न.प. हद्दीतील दररोज गोळा केली जाणारी बाजार वसुली मागील पाच वर्षात आश्चर्यकारकरित्या खाली आली आहे. सन 2015/16 ते 2018/19 मधील या बाजार करवसुलीत खूप मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची बाब समोर आली आहे. चाकण न.प.च्या बाजार वसुली अहवालानुसार दरवर्षी वसूल करण्यात येणारी बाजार वसूल रकमेत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. बाजार वसुली ही तत्कालीन ग्रामपंचायतचे व सध्याचे न.प.च्या दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बाजार वसुली हिशोबाचे काम वसुली लिपिकाकडे देण्यात आलेले आहे.

मात्र दैनंदिन गोळा होणारी बाजार वसुली रक्कम ही संबंधित वसुली लिपिक न.प.च्या लेखा विभागाकडे दररोज देत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बाजार वसुलीची पावती पुस्तके गरजेप्रमाणे भांडार विभागातून घेणे अपेक्षित असताना ही सर्व पुस्तके न.प. मधून गायब होऊन संबंधित लिपिकाच्या ताब्यात असल्याची बाबही खुद्द प्रशासनाच्या समोर आली आहे. दररोजच्या भरण्याची माहिती लेखा विभागाकडे सादर होत नसल्याचेही दिसून येत आहे. चाकण न.प.ची बाजार कर वसुली संशयाच्या भोवर्‍यात आली असून बाजार वाढत असताना वसुलीत प्रचंड तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे न.प.च्या उत्पन्नाला लाखो रुपयांचा खड्डा पडला असून बाजारात करवसुली करण्यासाठी निविदा मागवून खासगी ठेकेदार नेमावा लागणार आहे.

चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक

2015 ते 2018 दरम्यानच्या दररोज गोळा केल्या जाणाऱ्या बाजार करवसुलीतील अनियमितता समोर आली आहे.  2013 /14 मध्ये 10 लाख 7 हजार 750 रुपये एवढी बाजार कर वसुली होती. 2014/15 मध्ये 3 लाख 76 हजार, 2015/16 मध्ये 6 लाख 76 हजार 990 रुपये , 2016/17 मध्ये 3 लाख 66 हजार 100 रुपये, 2017-18 मध्ये 2 लाख 67 हजार 720 रुपये एवढीच बाजार करवसुली झाली आहे. बाजार वसुली लिपिक हरिश्चंद्र मारुती सायकर यांचाकडे याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून तपासणी अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे चाकण न.प.च्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.