Chakan : राष्ट्रवादीचे बंडोबा थंडावले; नाकदुऱ्या काढण्यात नेत्यांना यश

शिरूरमधील चित्र; ते दोन्ही बंडोबा प्रचारात सामील

एमपीसी न्यूज – सुरुवातीला काही जणांना अप्रत्यक्ष संकेत देऊन प्रत्यक्षात मात्र नवीन चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोसरी आणि शिरूर येथील दोन प्रमुख इच्छुकांची नाराजी ओढवून घेणाऱ्या राष्ट्रवादीने आता पक्षात काही प्रमाणात सुरु झालेली बंडाळी थोपविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत.

शिरूर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने भोसरी येथील इच्छुकांच्या समर्थकांची आणि त्यांची अत्यंत आग्रही कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहेत. भोसरी आणि शिरूरमधील इच्छुकांच्या नाकदुऱ्या काढून बंड थंड करण्यात नेत्यांना यश आले असून त्याचीच प्रचीती नुकत्याच रविवारी (दि.१६ मार्च) चाकण जवळील भोसे (ता. खेड) येथे झालेल्या मेळाव्यात त्या दोन्ही इच्छुकांनी हजेरी लावल्याने आली.

  • शिरूरमधील अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केल्याने अन्य इच्छुकांच्या विशेषतः भोसरीच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे टीका टिपण्या करण्यास सुरुवात केल्याने मोठय़ा प्रमाणावर बंडाळी झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या भोसरीच्या विलास लांडे आणि शिरूरच्या मंगलदास बांदल या इच्छुकांनी अखेर स्वतःच अधिकृत उमेदवारी मिळालेल्या अमोल कोल्हे या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ चाकणमध्ये रविवारी फोडल्याने बंडोबा थंडोबा झाल्याची चर्चा नागरिकांत आहे. सलग तीनदा राष्ट्रवादीला धूळ चारून सेनेचा झेंडा या मतदारसंघात फडकलेला असताना सेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात मागील काही दिवस दोन हात करण्यास का-कू करणाऱ्यांनी अनेकांनी अचानकपणे येथील उमेदवारी आपल्याच पदरात पडावी, यासाठी एवढा अकांड -तांडव का केला?, या प्रश्नाने सामान्यांना मात्र अद्यापही भंडावून सोडलेले आहे.

इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजी नाटय़ामुळे मागील काही दिवसांत सोशल मिडीयावर घडलेल्या आणि अन्य घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर संबंधितांचे बंड थंड होण्याच्या बेतात असल्याचे चित्र रविवारी चाकण येथील मेळाव्यात संबंधितांच्या उपस्थिती आणि आणाभाकांच्या मधून दिसून आले. शिरूरच्या इच्छुकांनी थेट बंड केले नसले तरी पक्षापासून ते लांब राहील्यास त्याचा प्रतिकूल परिणाम दिसू शकतो, हे लक्षात येताच त्यांचीही नाराजी दुर करण्यात आली आहे. तालुक्या-तालुक्यातील आपसातील मतभेद बाजूला ठेवण्याची पक्षातर्फे साद घातली जात आहे.

  • शिरूरचे इच्छुक आता एकनिष्ठतेच्या जितक्या शपथा घेत आहेत त्यावरून किमान ते या लोकसभा निवडणुकी पर्यंत तरी राष्ट्र्वादीच्या सोबत राहतील आणि भोसरीच्या इच्छुकांनी सकारात्मक भूमिका घेतली असली तरी त्यांनी आपल्या आग्रही कार्यकर्त्यांना लगाम घालावा असे खेडचे माजी लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर मेळाव्यात जाहीरपणे केलेल्या सूचक वक्त्याव्यास त्यामुळेच महत्व आले आहे.

सेनेला ही निवडणूक सोपी नाही 
दरम्यान, राष्ट्रवादीला एकीकडे उमेदवार मिळत नाही अशी चर्चा करणाऱ्या सेनेला राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे घाम फुटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सेनेचे विद्यमान खासदार आढळराव यांना ही निवडणूक पूर्वीप्रमाणे सोपी नसल्याची चर्चा नागरिकांत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.