Chakan : पोलीस हवालदाराचे आरोपींना मदत करणारे वर्तन

चाकण मध्ये पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल  

एमपीसी न्यूज – आरोपींना मदत करणारे वर्तन केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात काही वर्षे कार्यरत असलेल्या एम.पी.सूळ ,(वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांकडून देण्यात आली आहे.  यामुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह , पुणे ग्रामीण पोलीस दलात एकाच खळबळ उडाली आहे.

प्रलंबित गुन्ह्यांची प्रकरणे पोलीस स्टेशन मध्ये जमा केली नाहीत , त्या प्रलंबित प्रकरणांची निर्गती केली नाही, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे लेखी आदेशांची अवमान्यता केली, त्याच प्रमाणे न्यायालयात काही प्रकरणांचे अंतिम दोषारोप पत्र सादर केले नाहीत. याचा फायदा गुन्ह्यातील आरोपींना होण्याची शक्यता आहे.  चाकण पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई दिपाली रोहिदास थोरात यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती नुसार , एम.पी. सूळ हे पोलीस हवालदार चाकण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीस दलात असताना येथे मागील काही वर्षे नेमणुकीस होते. चाकण पोलीस ठाणे नवीन आयुक्तालयात गेल्यानंतर त्यांची ग्रामीण पोलीस दलात बदली झाली. दरम्यान त्यांच्याकडे भाग पाचचे  25, भाग सहाचे 7, दारूबंदीचे 17 तर मिसिंगचे 8 प्रलंबित अर्ज होते.

पोलीस शिपाई थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 5 सप्टेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान त्यांच्याकडे या गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणे चाकण पोलीस ठाण्यात जमा करण्याचे लेखी आदेश चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिले होते. मात्र सदरच्या आदेशांची अवमान्यता त्यांनी केली. त्याच प्रमाणे पोलीस हवालदार सूळ यांनी त्यांच्याकडील प्रकरणांचा अंतिम दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले नाहीत. त्याचा परिमाण गुन्ह्यातील आरोपींच्या दोषशाबितीवर होऊ शकतो. पो.ह. सूळ यांचे हे वर्तन गुन्ह्यातील आरोपींना मदत करणारेच असल्याचे महिला पोलीस शिपाई थोरात यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.