Chakan : कडाचीवाडीत जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; नात-जावयावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा मिळावा, यातून झालेल्या वादातून चिडलेल्या नात-जावयाने नव्वद वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मंगळवारी (दि. २१ मे ) रात्री साडेसात ते बुधवारी ( दि. २२ मे ) सकाळी सहा या दरम्यान गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडी (ता. खेड) येथील खांडेभराड वस्तीवर घडलेल्या या विचित्र घटनेप्रकरणी येथील पोलिसांनी बुधवारी (दि. २२ मे) रात्री उशिरा संशयित नात-जावयावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आनंदा गणपती खांडेभराड (वय – ९० वर्षे, रा. खांडेभराड वस्ती, कडाचीवाडी, ता. खेड) असे गळा आवळून खून झालेल्या वृद्ध शेतक-याचे नाव आहे. तर, नवनाथ काळूराम पानसरे (रा. रोहकल, ता. खेड) असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या संशयित नात-जावयाचे नाव आहे. आनंदा खांडेभराड यांचा मुलगा सुभाष आनंदा खांडेभराड ( वय – ५१ वर्षे, सध्या रा. राजकमल सोसायटी, मेदनकरवाडी, मूळ रा. कडाचीवाडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ पानसरे हा आनंदा खांडेभराड यांचा नात्याने नातजावई आहे. नवनाथ हा त्याची सासू, पुतण्या आणि सुभाष खांडेभराड यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीमध्ये बहिणीच्या हिश्याची मागणी करत होता. त्या कारणावरून खांडेभराड यांच्याशी वारंवार भांडणे करून त्यांना दमदाटी करत होता. परंतु सर्व जमीन आनंदा खांडेभराड यांच्या नावावर होती. आनंदा हे जिवंत असल्यामुळे जमिनीची वाटणी करता येत नाही,असे खांडेभराड यांनी नवनाथ याला समजावून सांगितले होते. परंतु नवनाथ हा काही केल्या कोणाचेच ऐकत नव्हता. एक दिवस म्हाता-याकडेच पाहून घेतो, असा दमही त्याने खांडेभराड यांना दिला होता.

बुधवारी (दि. २२ मे) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आनंदा खांडेभराड हे त्यांच्या राहत्या घरी मयत स्थितीत मिळून आले. त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा असल्यामुळे त्यांचे नातजावई नवनाथ पानसरे यांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याचा खांडेभराड यांचा संशय आहे. सुभाष खांडेभराड यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी नवनाथ पानसरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • दरम्यान, येथील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा तातडीने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी आणि विच्छेदन होताच अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.