Chakan : …येथे वाहनांना लागतोय ब्रेक; चाकण भागातील स्थिती

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चाकण (ता. खेड) येथील वाहतूक शाखेचे नवनवीन उपययोजना केल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला गती मिळाली असली तरी ठिकठिकाणी गावांना जोडणारे रस्ते, चौक, एमआयडीसीतील कारखान्यांच्या दिशेने जाणाऱ्या वळणामुळे वाहतूककोंडीची समस्या पुनःपुन्हा उद्भवत आहे.

सायंकाळी कंपन्यांच्या सुट्टीच्या वेळी या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. चाकण भागातील महामार्गावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आणि रस्त्याच्या रुंदीकरणांची कामे रेंगाळलेली असल्याने या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

  • या वाहतूककोंडीत हजारो वाहने दररोज काही भागांमध्ये अडकून पडत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर अन्य भागात वाहनचालक विना अडथळा मार्गक्रमण करीत असले तरी चाकणचा आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा, स्पायसर चौक, मोई फाटा, चिंबळी फाटा, मोशी येथे मात्र या वाहनांना हमखास ब्रेक लागत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.