Chakan : कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनसह 19 लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेल्या एटीएम मशीन असुरक्षित झाल्या आहेत. देहूगाव येथे एचडीएफसी बँकेची एटीएम मशीन फोडून मशीनमधून 91 हजार 300 रुपये चोरून नेल्याचा प्रकार चर्चेत असतानाच स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी चाकण येथील एचडीएफसी बँकेची एटीएम मशीनच चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांनी एकूण 18 लाख 98 हजार 700 रुपयांचा ऐवज पळवला आहे. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चाकणमधील चंदश्री कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली आहे.
नवनाथ उत्तम कणसे (वय 35, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील चंदश्री कॉम्प्लेक्स येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमधून दोन चोरटे आले. त्यांनी एटीएमसेंटर मधील एटीएम मशीन भोवती मोठी दोरी गुंडाळली. त्याआधारे एटीएम मशीन स्कॉर्पिओ कारमध्ये घालून तळेगाव चौकाच्या दिशेने चोरटे पळून गेले आहेत. पळवून नेलेल्या एटीएम मशीनमध्ये 16 लाख 98 हजार 700 रुपयांची रोकड होती. तर मशीनची किंमत 2 लाख रुपये आहे, असा एकूण 18 लाख 98 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, देहूगावात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार शनिवारी (दि. 2) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. एटीएम मशीनचा काही भाग फोडून त्याआधारे मशीनमधून 91 हजार 300 रुपये चोरून नेले आहेत. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकापाठोपाठ दोन एटीएम फोडण्याच्या आणि चोरीच्या घटना समोर आल्या असल्याने एटीएम मशीन चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.