Chakan : बळीचा बोकड सोडून त्यांनी काढला पळ

युवकांची सतर्कता; रोटाई तळ्या जवळील घटना

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी वनविभागाच्या जंगलात आणलेला बोकड काही जागरूक युवकांच्या प्रयत्नाने तसाच सोडून पळ काढण्याची वेळ काही भोंदू मंडळींवर आल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली.

आळंदी फाटा येथील वन हद्दीतील रोटाई तळ्याजवळ काही भोदूबाबांनी एका बोकडाला बळी देण्यासाठी आणले होते. या ठिकाणी भटकंतीसाठी युवक रूपेश येळवंडे, रवी धुळे, शमा आल्हाट, धम्मपाल आदींना हे दृष्य दिसले. संबंधितांकडे जाऊन या बाबतची विचारणा या युवकांनी केली. त्यानंतर सदरचा प्रकार अंधश्रद्धेतून केला जात असून संबंधित भोंदू भगतांनी हळद-कुंकू लावलेला बोकड बळी देण्यासाठी आणला असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर या युवकांनी अंनिसचे कार्यकर्ते मिलींद देशमुख, मनोहर शेवकरी यांना फोनवरून या बाबतची माहिती दिली.

  • आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच, अनिसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचेपर्यंत संबंधित भोंदूबाबा आणि त्याच्या समवेत असलेल्या काही नागरिकांनी बोकड जागेवरच सोडून पळ काढला. सदरच्या बोकडाला अंनिसचे कार्यकर्ते आशिष चौधरी यांनी सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे. भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये आणि कसल्याची प्रकारचे बळी देऊ नयेत. मंत्र-तंत्र करणार्‍या तांत्रिक मांत्रिकांना तुरुंगात डांबायच्या कडक तरतुदी आहेत. त्यामुळे अशा मंडळींच्या नादाला लागून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन चाकण अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.