Chakan : ‘तो’ खून सुपारी देऊन झाल्याचे तपासात उघड

पत्नीच्या आजोबांची नातजावयाने दिली पाच लाखाची सुपारी; चाकणमधील घटना

एमपीसी न्यूज – चाकणजवळ कडाची वाडी (ता. खेड,जि.पुणे) येथे पत्नीचे आजोबा जिवंत असेपर्यंत जमिनीची वाटणी होणार नसल्याने जमीन वाटणी व्हावी आणि हिस्सा मिळावा म्हणून पत्नीच्या आजोबांचा खून नात-जावयाने सुपारी देऊन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.

पत्नीच्या माहेरकडील जमिनीत वारंवार मागणी करूनही बहिनीच हिस्सा मिळत नसल्याने आणि पत्नीचे आजोबा जिवंत असल्याने वाटणी होत नसल्याने पत्नीच्या नव्वद वर्षीय आजोबांचा नात जावयाने खून केल्याची धक्कादायक घटना कडाचीवाडी (ता. खेड) येथे बुधवारी (दि.२२) उघडकीस आली होती.

  • आनंदा गणपती खांडेभराड (वय ९०, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा नात-जावई नवनाथ काळूराम पानसरे (रा. रोहकल, ता.खेड, जि. पुणे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा खांडेभराड हे कडाची वाडी खांडेभराडवस्ती येथील जुन्या घरामध्ये एकटेच झोपलेले होते. बुधवारी (दि.२२) सकाळी सहाचे सुमारास नातेवाईकांनी पहिले असताना त्यांच्या गळयावर जखमा झालेल्या होत्या आणि ते मयत झाले होते. नवनाथ पानसरे हा गेले ६ महीन्यापासून त्यांना भांडण करून त्याची बायको योगिता हिच्या वाटणीची जागा माझे नावावर करून द्या, असे म्हणून नेहमी घरी जाऊन भांडण करीत होता.

  • परंतु सर्व जमीन आनंदा खांडेभराड (मयत) यांचे नावे आहे. ते जिवंत असेपर्यत जमीन कोणाच्याही नावावर होऊ शकत नाही, असे समजावून सांगत होते. परंतु तो ऐकून घेत नव्हता, कशी नावावर होत नाही? असे बोलून तो दमदाटी करीत होता. तसेच म्हाता-याकडेही बघून घेतो अशी धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केलेला होता. त्या अनुषंगाने तपास करून प्रथम नवनाथ पानसरे याचा शोध घेऊन त्याचेकडे तपासावेळी प्रश्न विचारले असता तो उडवउडवीची उत्तरे देत होता. परंतु त्यास विश्वासात घेऊन पोलिसांनी तपास केला असता त्याने आनंदा खांडेभराड हे जो पर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत बायको योगिता हिचे वाटणीची/हिस्स्याची जागा माझे नावावर करून देत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा खुन सुपारी देऊन करूवून घेतलेची कबुली दिली.
_MPC_DIR_MPU_II

आनंदा खांडेभराड यांच्या खुनाची सुपारी पानसरे याने त्याचा मित्र निलेश ऊर्फ हरिभाउ दामू मांडेकर (रा. आंबेठाण ता. खेड, जि. पुणे) याला दिली होती. मांडेकर याने त्याचे ओळखीचे अशोक विष्णु खेडकर (रा. साईमंदीर कॉलनी,वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे), गोल्या राठोड (रा. च-होली फाटा ता. हवेली, जि. पुणे, मुन्ना मुसळे (रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे) आणि सध्या चाकण येथे वास्तव्यास असलेल्या मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका अल्पवयीन युवक अशा चौघांनी खून करण्याचा कट रचला. त्यापोटी त्यांना ५ लाख देण्याचे ठरले होते, असेही तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अशोक विष्णु खेडकर (रा. वडमुखवाडी, ता. हवेली) हा मिळुन आला त्यानेही या घटनेची कबुली दिली.

  • वरील चौघांनी नवनाथ पानसरे याचे नवीन मोटार कारमधून कडाचीवाड़ी खांडेभराडवस्ती येथे आले. खांडेभराडवस्ती येथे आनंदा खांडेभराड यांचे घराजवळा चाकण-शिक्रापूर रोडचे कडेला असलेले मोकळे मैदानात कार उभी करून थोडावेळ थांबले. त्यानंतर मंगळवारी (दि.२१ मे) रात्री बारा वाजता हातात पायमोजे घालून खांडेभराड यांच्या घरात शिरले.

तेथे गाढ झोपलेले आनंदा खांडेभराड यांना झोपेतच त्यातील दोघांनी हाताने बराचवेळ गळा, तोंड दाबुन धरले. त्यावेळी ते तडफडत असताना एकाने पाय दाबून धरले. ते मयत झालेची खात्री झालेनंतर ते सर्वजण पुन्हा कारमधून मोशी टोल नाका येथे आले. तेथे त्याना टपरीवर चहा घेतला आणि थोडा वेळ तेथेच थांबले. त्यानंतर पुन्हा चाकणहून शिक्रापूर रस्त्याने खांडेभराडवस्ती येथे आनंदा खांडेभराड मयत झाले आहेत काय? याबाबत खात्री केली. त्यानंतर ते वडगाव घेनंद मार्ग आळंदी येथे गेले.

  • दरम्यान, अशोक खेडकर याने मोबाईल फोन वरून निलेश ऊर्फ हरिभाउ दामू मांडेकर यास काम झालेबाबत ‘ओके’ असा टेक्स मेसेज केला होता. त्याचप्रमाणे निलेश मांडेकर याने सकाळी नवनाथ पानसरे यास काम झालेबाबत ‘ओके’ असा मेसेज केला आहे.

नवनाथ काळुराम पानसरे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरूध्द चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात तो ६ महिने येरवडा कारागृहात होता. नुकताच तो जामीनावर सुटून बाहेर आलेला होता. या गुन्हयाचा उकल चाकण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.