Chakan: तब्बल 85 चिकन व अंडी विक्रेते ‘होम क्वारंटाईन’, अंडी पुरवठादार निघाला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – भोसरीतील एक अंडी पुरवठादार कोरोनाबाधित असल्याचे काल (मंगळवारी) निष्पन्न झाल्यानंतर खेड तालुक्यातील संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या अंडी पुरवठादाराच्या संपर्कात आलेल्या चाकणमधील तब्बल 85 चिकन व अंडी विक्रेत्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. शहरातील चिकन व अंड्यांची सर्व दुकाने बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

भोसरी येथील संबंधित अंडी पुरवठादाराने चाकणलगतच्या नाणेकरवाडी, मेदनकरवाडी भागातील तब्बल 85 किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तालुका वैद्यकीय विभागाने येथील 85 चिकन व अंडी विक्रेत्यांना होम क्वारंटाईन केले आहे. चाकण पालिकेने तत्काळ शहरातील सर्व चिकन व अंड्यांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

चाकण नगरपालिकेच्या हद्दीत संबंधित अंडी पुरवठादाराने कोणाला चिकन अथवा अंड्यांचा पुरवठा केला होता का, याचा शोध नगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.  दरम्यान चाकण शहराच्या सीमा आता लगतच्या नागरिकांना येण्यासाठी बंद केल्या जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर पडू नये, लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, सध्याच्या परिस्थितीत चिकन व अंडी खाऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

खेड तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गाढवे , चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कणकवले यांनी नाणेकरवाडी व मेदनकरवाडी येथील 85 जणांना होम क्वारंटाईन केल्याचे सांगितले. चाकण नगरपालिकेच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना तूर्त चिकन व अंडी न खाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकारामुळे चाकण शहरात व परिसरात काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like