Chakan : तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा; 50 रुपयांचा कांदा 15 रुपयानेही खपेना!

एमपीसी न्यूज – देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. चाकणसारख्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या भागात सध्या तुर्कस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मात्र, या कांद्याला अजिबात खरेदीदार मिळत नसल्याने ‘तुर्कस्तानच्या कांद्याने केला, व्यापाऱ्यांचा वांदा’ अशीच काहीशी स्थिती चाकण मार्केट मध्ये पहावयास मिळत आहे.

50 ते 60 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा चाकण मार्केटमध्ये 15 ते 20 रुपये किलोदराने देखील विक्री होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने व कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून एक लाख मेट्रीक टन पेक्षा अधिक कांदा तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. परदेशातून आयात केलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वी इजिप्तचा कांदा चाकण बाजारात दाखल झाला होता. आता तुर्कस्तानचा कांदा चाकण मार्केट मध्ये विविध व्यापार्यांकडे कंटेनर भरून दाखल होत आहे. मात्र या कांद्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवली आहे.

चवीला अत्यंत सुमार दर्जाचा असलेला तुर्कस्तानचा कांदा हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य नागरिक खरेदी करण्यास तयार नाहीत. गावरान कांद्याच्या तुलनेत या तुर्कस्तानच्या कांद्याला अजिबात चव नसल्याचे नागरिक आणि खुद्द कांदा व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे कांद्याच्या व्यापार्यांनी पन्नास ते साठ रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा दहा ते पंधरा रुपये किलो दराने चाकण मध्ये विक्री करावा लागत असून त्यालाही ग्राहक नसल्याची स्थिती समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, चाकण मार्केट मध्ये गावरान कांद्याची आवक घसरली आहे. बुधवारी (दि. 15) चाकण मार्केट मध्ये पंधरा हजार पिशवी गावरान कांद्याची आवक होऊन गावरान कांद्याला प्रतवारीनुसार प्रती किलोस 40 ते 45 रुपये असा भाव मिळत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.