Chakan: कंपनीसमोर पार्क केलेल्या वाहनांवर चोरांचे लक्ष; भरदिवसा दोन वाहनांची चोरी

चाकण परिसरातून कंपनीसमोर पार्क केलेली दोन वाहने चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

एमपीसी न्यूज – कंपनीसमोर पार्क केलेली वाहने वाहन चोरांचे टार्गेट ठरत आहेत. दिवसभर कामगार कंपनीत काम करत असल्यामुळे वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत वाहन चोरटे कंपनी समोरून वाहने चोरून नेत आहेत. चाकण परिसरातून कंपनीसमोर पार्क केलेली दोन वाहने चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पहिल्या घटनेत दत्तात्रय कुंडलिक पौळेट (वय 34, रा. शिरोली, ता. खेड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दत्तात्रय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्तात्रय हे म्हाळुंगे येथील युसेन लॉजिस्टिक या कंपनीत काम करतात. 23 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ते कामावर गेले.

त्यांनी त्यांची 45 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 14 एफजे 3479) कंपनीच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केली. दिवसभर काम करून दुपारी साडेपाच वाजता ते बाहेर आले असता त्यांना त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये आढळून आली नाही.

दुस-या घटनेत अशोक त्रिंबक सुरवसे (वय 30, रा. सांगुर्डी फाटा, येलवाडी, ता. खेड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी सुरवसे हे निघोजे येथील महिंद्रा कंपनीत काम करतात. ते दररोज त्यांची सात हजार रुपये किमतीची (एमएच 09 एक्स 8219) ही दुचाकी सांगुर्डी फाटा येथील जे के प्लाय हार्डवेअर या दुकानासमोर पार्क करतात आणि कंपनीच्या बसने कामावर जातात.

22 जुलै रोजी देखील सकाळी सहा वाजता सुरवसे नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी साडेतीन वाजता सुरवसे पुन्हा कंपनीच्या बसने सांगुर्डी फाटा येथे आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळली नाही. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.