Chakan : दोन लाखांच्या मोटारसायकल चोरट्यांनी पळवल्या

एमपीसी न्यूज – वाहन चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नसून दिवसेंदिवस वाहने चोरीला जात आहेत. फॉर्च्युनर, इनोव्हा अशा महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकल चोरीला जात आहेत. गुरुवारी (दि. 11) चाकण, निगडी, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात 1 लाख 91 हजार 244 रुपये किमतीच्या सहा मोटारसायकल चोरीला गेल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चाकण पोलीस ठाण्यात तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 96 हजार 244 रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. पहिल्या गुन्ह्यात काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस (एम एच 14 / जी पी 4440) राहत्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली. याप्रकरणी अजित देवराम धिवरे (वय 39, रा. खराबवाडी) यांनी फिर्याद दिली.

  • दुस-या घटनेत रियासाद हसन अन्सारी (वय 33, रा. कुरुळी) यांनी फिर्याद दिली. त्यांची हिरो पॅशन प्रो (एम एच 14 / 3512) नाणेकरवाडी येथील ऑटो लाईन कंपनी समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तिस-या घटनेत अमोल कैलास लंघे (वय 32, रा. करडे, ता. शिरूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, नाणेकरवाडी येथील मिंडा कंपनीसमोरून त्यांची स्प्लेंडर प्लस (एम एच 12 / डी क्यू 1485) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
निगडी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमलेश अवधेश चंचल (वय 28, रा. पिंपळे सौदागर) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची होंडा ऍक्टिवा (एम एच 14 / एफ यु 8691) थरमॅक्स चौकात क्रिष्णा मोबाईल शॉपी समोर लॉक करून पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लॉक तोडून चोरून नेली.
  • चिखली पोलीस ठाण्यात साधू गुलाब आडके (वय 43, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली. त्यांची काळ्या रंगाची होंडा सीडी डिलक्स (एम एच 12 / एफ एल 3493) राहत्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी तिचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.
ओंकार अनिल तावरे (वय 25, रा. औंधगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. ओंकार यांनी पंजाबी रसोई या हॉटेलच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला त्यांची यामाहा कंपनीची आर 15 (एम एच 12 / के ए 0046) ही दुचाकी पार्क केली. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.