Chakan : खूनप्रकरणी चौघांवर तर, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; मेदनकरवाडी घटनेत परस्परविरोधी तक्रारी

एमपीसी न्यूज – चाकणजवळील मेदनकरवाडी (ता. खेड) येथील खूनप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. एका गटावर खुनाचा तर दुसऱ्या गटावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

घराजवळून येणाऱ्या जाणाऱ्या तीन फुटी रस्त्याच्या वापरावरून कल्पना विक्रम शितोळे ( वय – ४५ वर्षे, रा. मेदनकरवाडी, शंकरनगर, ता. खेड,) या स्वतःच्या राहत्या घरासमोर भांडी घासत असताना त्यांचे तोंड दाबून घरात उचलून नेऊन घराची कडी आतून लावून लाकडी दांडक्याने, दगडी पाट्याने, कुकरच्या झाकणाने, फरशीच्या तुकड्याने गंभीर मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी आठचे सुमारास मेदनकरवाडी येथील शंकरनगर भागात घडली होती.

  • अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे व सुशीला शांताराम भुसारे (सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड,) या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. अनिल हेंद्रे हे जखमी असल्याने त्याच्यावर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अनिल हेंद्रे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम नारायण शितोळे आणि वैभव विक्रम शितोळे (दोघेही रा. मेदनकरवाडी, शंकरनगर, ता. खेड) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.