Chakan : रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या दोन तरुणांना भरधाव वेगात आलेल्या वाहनांनी जोरात धडक दिली. या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात शनिवारी (दि. 8) चाकण परिसरात घडले आहेत.

पहिल्या घटनेत धनंजय बाबासाहेब खेडकर (वय 29) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव बाबासाहेब खेडकर (वय 36, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुभाष राजू रोकडे (रा. मंचर, ता. आंबेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनंजय शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावरून जात होता. महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने त्याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या धनंजय यांचा मृत्यू झाला.

दुस-या घटनेत सोनू पराग चौधरी (वय 22, रा. भांबोली, ता. खेड, पुणे. मूळ रा. खलिदाबाद, ता. मेदावाल, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामचरित चतरभुजी चौधरी (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोनू भांबोली येथील जयवूड पॅलेट कंपनीत काम करत होता. शुक्रवारी रात्री आठ वाजता तो कंपनीत कामावर गेला. रात्री त्याची तब्बेत बिघडल्याने त्याने व्यवस्थापक आशिष शर्मा यांना घरी जात असल्याचे सांगितले.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास तो कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाला. घरी जात असताना वराळे ते भांबोली या रस्त्यावर भांबोली फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सोनूचा मृत्यू झाला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.