Chakan : कंपनीला ‘ब्लॅकमेल’ केल्याप्रकरणी एका बड्या कामगार नेत्यासह नऊजणांना अटक

एमपीसी न्यूज – कामगारांना फूस लावून कंपनीला ‘ब्लॅकमेल’ करीत दगडफेक केल्याप्रकरणी एका बड्या कामगार नेत्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. चाकण-म्हाळुंगे पोलिसांनी बुधवारी (दि. 19) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास निघोजे येथे ही कारवाई केली. 

विजय पांडुरंग पाळेकर (वय 51, रा. लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या कामगार नेत्याचे नाव आहे. याच्यासह संदीप नानासाहेब बोराडे (वय 32, रा. रुपीनगर, हवेली), गजेंद्र ज्योतिबा पोरटे (वय 38, रा. किवळे, मावळ), शरद महादेव खरात (वय 33, रा. तळवडे), सुधीर मधुकर जगताप (वय 28, विठ्ठलवाडी, देहूगाव), पी. बाळकृष्ण (वय 52, रा. खराबवाडी, चाकण), अविनाश ध्रुव यादव (वय 29, रा. खराबवाडी, चाकण), अण्णासाहेब बोराडे (वय 22, रा. निघोजे), योगेश मदन पवार (वय 29, रा. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सागर अरविंद शौचे (वय 34, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, निघीजे येथे ‘केल्विन इंडिया’ ही जर्मनबेस कंपनी आहे. या कंपनीतील शिवक्रांती या संघटनेचे कामगार वारंवार कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून निघून जात होते. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना जाब विचारण्यात आला. त्यामुळे कंपनी आणि कामगार यांच्यात तणाव निर्माण झाला. या संधीचा फायदा घेत शिवक्रांती संघटनेचा सरचिटणीस आरोपी पाळेकर याने कामगारांना फूस लावली. तसेच, अन्य कामगारांवर जबरदस्ती करीत काम बंद करण्यास भाग पाडले. पाळेकर याने कामगारांना भडकावून देत कंपनीवर दगडफेकही केली. यावेळी कामगारांना शांत करण्यासाठी बाहेर आलेल्या अधिकाऱ्यांना देखील त्याने शिवीगाळ केली.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त स्मिता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. त्यांनी अधिक चौकशी केली असता पाळेकर याने कंपनीकडे ‘कामगारांना परमनंट करा, नाहीतर मला एक लाख रुपयांचा हप्ता द्या, अशी मागणी केल्याचे समोर आले. कंपनीने हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर पाळेकर याने कंपनी चालू न देण्याची धमकी देखील दिल्याचे व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पाळेकरसह नऊ जणांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाळेकर याने आणखी काही कंपन्यांना ब्लॅकमेल केले असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

कंपनीकडून खोटे गुन्हे दाखल – पाळेकर

महाळुंगे येथील कंपनीतील वादाशी आमचा काडीमात्रही संबंध नसताना जाणीवपूर्वक आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत न केलेल्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कंपनीमध्ये कामगार व कंपनी यांच्यात सकाळी वाद झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंपनीत गेलो असता कामगारांसह आमच्यावर देखिल खोटे गुन्हा दाखल करत शिवक्रांती कामगार संघटना, कामगार व कामगारनेते यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे विजय पाळेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.