Chakan : आर्थिक व्यवहारावरून तरुणाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – घेतलेले पैसे देण्यासाठी तरुणाला बाहेर बोलावून पैसे देणार नसल्याचे सांगत प्लॅस्टिक पाईपने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकराच्या सुमारास झित्राईमळा आंबेठाण येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मयूर राजाराम गोरे उर्फ गोट्या (वय 28, रा.झित्राईमळा आंबेठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सनी कैलास गोरे (वय 27, रा. दावडमळा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने सनी यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे सनी मागत होते. या कारणावरुन मयूर याने रविवारी सकाळी झित्राईमळा आंबेठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सनी यांना पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.

सनी शाळेवर आले असता ‘तू मला सारखे पैसे मागू नको, मी तुला पैसे देणार नाही’ असे म्हणत मयूर याने त्यांना प्लॅस्टिकच्या भरीव पाईपने मारहाण केली. यामध्ये सनी यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.