Chakan : पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने बाप लेकाने मिळून पुतण्याला खोऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील कुरकुडी येथे घडली.

देविदास रोहिदास भोकसे (वय 24, रा. कुरकुडी, ता. खेड) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अविनाश सुदाम भोकसे, सुदाम बाळू भोकसे, दादाभाऊ सुदाम भोकसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी देविदास त्यांच्या शेतात बाजरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पिकाला पाणी देण्यासाठी खोरे लागत असल्याने त्यांनी चुलत चुलते आरोपी सुदाम यांना खोरे मागितले. त्यावर ‘खोरे तुझ्या बापाचे आहे का, मी देत नाही’ असे म्हणून शिवीगाळ केली.

सुदाम आणि त्याचा मुलगा अविनाश यांनी खोऱ्याने देविदास यांना मारहाण केली. देविदास यांच्या डोळ्याच्या खाली, कानावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सुदाम आणि दादाभाऊ या दोघांनी मिळून पुन्हा लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि निघून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.