Chakan : पानटपरीवरील उधारी मागितल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पानटपरीवरील जुनी उधारी मागितल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात टपरीवरील काचेची बरणी मारली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊच्या सुमारास खालुंब्रे गावाच्या हद्दीत घडली. उपचारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष रमेश चव्हाण (वय 18, खालुंब्रे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निखिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष त्यांच्या काकांच्या पानटपरीवर होते. त्यावेळी आरोपी निखिल टपरीवर आला. त्याने पान देण्यास सांगितले. त्यावेळी आशुतोष यांनी आरोपीला अगोदरचे पैसे मागितले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच पैसे देणार नाही, असे म्हणत पानटपरी दुकानात ठेवलेली काचेची बरणी आशुतोष यांच्या डोक्यात मारली. यामध्ये आशुतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर पुढील उपचारासाठी आकुर्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.