Chakan : राजकीय इच्छाशक्तीच्या चिखलात रुतला ‘चाकणचा विकासरथ’

एमपीसी न्यूज – मागील अनेक वर्षात चाकणचे शासन बदलले, शासनकर्ते बदलले. अनेकांनी चाकणचा कायापालट करण्याच्या वल्गना केल्या. अनेक आश्वासने देऊन मतांची जुळवणी केली. मात्र ही आश्वासने, विकास केवळ कागदावरच राहिला आहे. चाकणचा विकासरथ राजकीय इच्छाशक्तीच्या चिखलात रुतला आहे. याबाबत परिसरातील नागरिक खंत व्यक्त करीत आहेत.

चाकण शहर पुणे-नाशिक महामार्गवर आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहत शहरात सुरु झाली म्हणजे शहराचा विकास झाला असं म्हटलं जातं. पण हे विधान चाकणकरांच्या नजरेत चुकीचं ठरत आहे. स्थानिक नागरिकांना रोजच्या मूलभूत गरजांच्या समस्या भेडसावत आहेत. नाशिक फाटा ते राजगुरूनगर रस्ता रुंदीकरण, तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडले आहे. ते अद्याप झालेले नाही. आंबेठाण चौक, चाकण चौक, आळंदी फाटा येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. मात्र तो गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त कागदावरच आहे.

चाकण एमआयडीसी टप्पा पाच मध्ये नवनवीन मोठे कारखाने आणणार असल्याचे चाकणकरांना सांगण्यात आले. दरम्यान लॉजीस्टिक पार्कच्या नावाखाली जागा इन्व्हेस्टरला विकल्या गेल्या. सध्या छोट्या-मोठ्या उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी एमआयडीसीकडून नाही तर या इन्व्हेस्टर लोकांकडून जागा, शेड भाड्याने घ्यावे लागणार आहेत. ही छोट्या-मोठ्या उद्योगजकांची पिळवणूक आहे. चाकण येथे विमानतळ होणार होते. विमानतळाच्या नावाखाली या भागाचा विकास होणार होता. मात्र विमानतळ रद्द झाले आणि चाकण व खेड परिसरातील विकासच थांबला, याची खंत परिसरातील नागरिक राजेश अगरवाल यांनी व्यक्त केली.

चाकण भागातील अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी व नियोजित विकास होण्यासाठी महानगरपालिका होणे ही काळाची गरज आहे. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव पाहायला मिळत आहे. पीएमआरडीए चाकण भागातून शेकडो कोटी रुपयांचा महसूल वसूल करत आहे. पण विकास मात्र शून्य आहे. चाकण भागात सक्षम पाणी योजना नाही, उत्तम गटार व्यवस्था नाही, चांगले अंतर्गत रस्ते नाहीत. एमआयडीसी परिसरात माथाडीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली सुरु आहे. या संपूर्ण प्रकाराला चाकण परिसरातील नागरिक, उद्योजक कंटाळले आहेत.

करापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा केला जातो. पण त्याबदल्यात नागिरकांना मूलभूत सुविधांसाठी सुद्धा शासनासोबत भांडावं लागत आहे, हे नागरिकांचे दुर्दैव आहे. हे चित्र कधी बदलणार. चाकणचा विकास कधी होणार? असा संतप्त सवाल राजेश अगरवाल यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.