Haryana: समान काम, समान वेतनाची अखिल भारतीय विद्युत संविदा मजदूर महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याच्या दृष्टीकोनातून अखिल भारतीय विद्युत संविदा मजदूर संघ ही संघटना भारतीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली सुरू करण्यात आली. अखिल भारतीय विद्युत संविदा मजदूर महासंघाचे प्रथम अधिवेशन दि. 7 व 8 मार्च दरम्यान हरियाणा येथे संपन्न झाले.  कंत्राटी कामगार प्रथेत बदल करून सुप्रीम कोर्टाने देशासाठी लागू केलेल्या समान काम समान वेतन पध्दतीची सुरूवात करावी, यासह कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या या अधिवेशनामध्ये मांडण्यात आल्या.

 

हरियाणा येथे झालेल्या या अधिवेशनासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, राहुल बोडके, सागर पवार, जयेंद्र थुळ, अजित शिंदे, अमर लोहार, राजकुमार काळे, सचिन भुसावळ, विकास आडबाले तसेच भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन, हरियाना राज्याचे माजी श्रममंत्री व खासदार नायबसिंह सैनी,  विद्युत क्षेत्र प्रभारी भारतीय मजदूर संघाचे अख्तर हुसेन, अखिल भारतीय विद्युत मजूदर संघाचे महामंत्री अमरसिंह सांखला, भारतीय ठेका मजदूर महासंघाचे ब्रीजबिहारी शर्मा, हरियाना भारतीय मजदूर संघाचे हनुमान गोदरा,  भारतीय ठेका मजदूर महासंघ प्रभारी वीरेंद्र कुमार, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ मंत्री जयेंद्र गढवी इत्यादी वरिष्ठ पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

 

या अधिवेशनाद्वारे विविध राज्यातील कंत्राटी कामगारांना एकत्र करून देशपातळीवर कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरूध्द आवाज उठवण्यात आला. राज्यातील वीज कंपन्यात हजारो  कंत्राटी वीज कामगार विविध रिक्‍त पदांवर काम करत आहेत त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

 

यामध्ये कंत्राटी कामगार प्रथेत बदल करून सुप्रीम कोर्टाने देशासाठी लागू केलेल्या समान काम समान वेतन पध्दतीची सुरूवात करावी, वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना रोजगारांची शाश्‍वात हमी मिळावी, योग्य वेतन व इतर सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्याबाबत जबाबदारी निश्‍चित करावी, देशभरातील सर्व कंत्राटी कामगारांना वेतन, भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, वेतनचिठ्ठी, ओळख पत्र सुविधा पोर्टल प्रमाणे मिळाव्यात, नवीन भरती प्रक्रियेबाबत सध्या देशभरात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगाराचा अनुभव लक्षात घेऊन भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, सद्यस्थितीचा विचार करून देशभरातील कंत्राटी कामगारांची कामाची पध्दत निश्‍चित करावी, देशभरात कामगार कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी व कठोरपणे करण्यात यावी, कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच राहिले पाहिजेत अशी व्यवस्था करावी, प्रीपेड मीटर मुळे सध्या काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.