Chandkhed : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणांचे वाटप

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम 2020-21साठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे योग्य दरामध्ये गावात शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी गटामार्फत उपलब्ध करण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने चांदखेडमध्ये महाबीजचे इंद्रायणी जातीचे भाताचे 30 क्विंटल बियाणे सेफ डिस्टन्स पाळून शेतकऱ्यांच्या बांधावर शनिवारी (दि. 9) वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांना घरपोच बी -बियाणे उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून या योजनेचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच हा बियाणे वाटपाचा कार्यक्रम मावळ तालुक्यातील पहिला नसून पुणे जिल्ह्यातील बांधावर बियाणे वाटपाची सुरुवातच मौजे चांदखेड या गावातूनच झालेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ही योजना जाहीर केली असून, शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे बांधावर उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. स्थानिक शेतकरी गटामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

चांदखेड येथील कडजाईमाता महिला शेतकरी गट व श्री संत रामजीबाबा शेतकरी गटामार्फत गरजू शेतकऱ्यांना खरीप भात पिकाचे बियाणांचे शनिवारी वाटप करण्यात आले. मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडलकृषी अधिकारी दत्ता शेटे, पर्यवेक्षक एन बी साबळे व सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी चांदखेड गावात या योजनेचा प्रारंभ करून बी बियाणे व खते वाटप केले.

या योजनेद्वारे मावळातील शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.