Chandni Chowk Bridge Blast : स्फोटानंतर पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त केला चांदणी चौकातील पूल, सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्याचा चांदणी चौकातील पूल अखेर काल (शनिवारी) मध्यरात्रीनंतर एक वाजता नियंत्रित स्फोट (Chandni Chowk Bridge Blast) घडवून पाडण्यात आला. स्फोटात पूल पूर्णपणे न पडल्याने पोकलेनच्या मदतीने तो जमीनदोस्त करावा लागला. उध्वस्त पुलाचे अवशेष दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

स्फोटानंतरही पूलाचा लोखंडी सांगाडा तसाच राहिल्याने पोकलेन व जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्यात आला. काही स्फोटकांचा स्फोट झाला नसल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

चांदणी चौक आणि परिसरात सकाळी आठवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्फोट घडवून पाडलेला पुण्यातील हा पहिलाच पूल असल्याने नागरिकांमध्येही त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. पाडलेल्या पुलाचा राडारोडा अन्यत्र हलविण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण होईपर्यंत परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुण्याच्या चांदणी चौकात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने पूल पाडण्याचा (Chandni Chowk Bridge Blast) निर्णय घेण्यात आला होता. कमी वेळेत पूल पाडून त्याचा राडारोडा जमा करणे आणि वाहतूक कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नोएडा येथील जुळे मनोरे तसेच बोरघाटातील अमृतांजन पूल पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे कंत्राट देण्यात आले.

कंपनीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रारंभी पुलाच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटके भरण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तांत्रिक कामांची पूर्तता करण्यात आली. शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या परिसराची हवाई पाहणी केली.

सहाशे किलो स्फोटके, 1300 छिद्रे

पूल पाडण्यासाठी सुमारे सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. सुमारे 1,300 छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती.

शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली. मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील (Chandni Chowk Bridge Blast) सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला. स्फोटाच्या परिसरात ठराविक जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.

पूल पाडण्यासाठी रात्री आठपासूनच शेवटची तांत्रिक कामे सुरू करण्यात आली होती. स्फोटानंतर पुलाचे अवशेष बाहेर उडू नये, यासाठी संपूर्ण पुलाला झाकून घेण्यात आले होते. स्फोटाची तीव्रता कमी करण्यासाठी वाळूची पोती आणि स्पंज यांचा वापर करण्यात आला.

रात्री 11 नंतर वाहतूक पूर्ण बंद

रात्री अकराच्या सुमारास या भागातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पूल पाडण्याच्या कामात प्रत्यक्षात सहभागी असणाऱ्या मोजक्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना वगळता या भागात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. रात्री बाराच्या सुमारास स्फोटकांच्या केबल मुख्य सर्किटला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

पूल पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात (Chandni Chowk Bridge Blast) सुमारे 400 पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत कोणीही जवळपास नसल्याची खातरजमा करून घेतली. या प्रक्रियेत ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली. शेवटी दहा आकड्यांचा काऊंटडाऊन सुरू करण्यात आली आणि ती पूर्ण होताच 30 मीटर लांबीचा हा पूल इतिहासजमा झाला. स्फोटानंतरही  संपूर्ण पूल पडला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर जेसीबी व पोलकेलनच्या मदतीने पुलाचा लोखंडी सांगडा व राहिलेला भाग पाडण्यात आला.

पूलाचे अवशेष हटविण्याची मोठी यंत्रणा

चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. 1,350 डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, दोन अग्निशमन वाहने, तीन रुग्णवाहिका, दोन पाण्याचे टँकर वापरण्यात येत आहेत.

पूल पाडण्यापासून (Chandni Chowk Bridge Blast) रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नेमण्यात आले आहेत. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीची आणि साधारण 35 मिमी व्यासाची 1,300 छिद्रे पाडण्यात आली होती. त्यात 600 किलो स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. पूल पाडताना त्याचे अवशेष अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6,500 मीटर चॅनल लिंक्स, 7,500 चौरस मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या गोण्या आणि 800 चौरस मीटर रबरी मॅटचा वापर करून पूल झाकून घेण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी घातले वैयक्तिक लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याकडून साताऱ्याकडे जात असताना 27 ऑगस्टला त्यांचा ताफा चांदणी चौकातील परिसरातच वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता. त्यामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील या टप्प्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शिंदे साताऱ्याहून पुन्हा मुंबईकडे परतत असताना ते या भागात थांबले आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि पाहणी केली. येथील वाहतूक कोंडींचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही संबंधित ठिकाणी भेट दिल्यानंतर चांदणी चौकात महामार्गावरून जाणारा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.