Pune News : अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – चंद्रकांतदादा पाटील

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडणे हास्यास्पद आहे. लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काल राज्यातील विविध ठिकाणी आयकर खात्याने मारलेले छापे गेले सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत, असे त्या खात्याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे असे सांगणे हा मोठाच विनोद आहे. राज्यातील २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांवरील छापे हे एकदोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर खात्याने याबाबत बरीच तयारी केली असावी हे या कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.

पाटील पुढे म्हणाले, आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.