Pune : सत्तेचे स्वप्न भंगल्याने चंद्रकांत पाटील यांना दुःख; अजित पवार यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – गेल्या २५ वर्षांपासूनचा मित्र पक्ष शिवसेना त्यांच्यापासून बाजूला गेला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सत्तेचे स्वप्न भंगले, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल केला. भाजप आमदारांची संख्या १०५ असूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. हे दुःख त्यांच्या मनात खूप वेदना देऊन जात आहे. त्यामुळे सातत्याने अशाप्रकारची वक्तव्ये त्यांच्याकडून होत आहेत, असेही पवार म्हणाले.

नागपूर अधिवेशनातही अशा प्रकारची काही वक्तव्य केली गेली. त्या वक्तव्यांबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते’ व ‘कावळ्याच्या शापानं गुरे मरत नसतात’, अशा मराठीतील म्हणींचा उच्चार करीत अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेतला.

आणखी एक म्हण आहे ती म्हणजे चोराच्या मनात चांदणं असतं, चंद्रकांत पाटील यांना माहिती पाहिजे की, कोणतीही खाती कुणाकडे जरी असली, तरी राज्याचा प्रमुख जो असतो तोच सर्व खात्यांचा प्रमुख असतो. कुठल्याही खात्यासंदर्भातला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असतो, असेही अजित पवार यांनी यावेळी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like