Pune News : एन. डी. पाटील यांच्या निधनाने सामान्यांसाठी लढणारे नेतृत्व गमावले – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातील एक मोठे नाव इतिहासजमा झाले आहे. कोणाचीही भीडभाड न ठेवता सामान्य माणसासाठी पोटतिडकीने लढणारा नेता आपण गमावला असून त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी अर्पण केली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एन. डी. पाटील म्हणजे अन्यायाच्या विरोधात संघर्ष अशी स्थिती होती. संघर्षाला पर्यायी शब्द एन. डी. पाटील होते. कोणाचीही भीडभाड न ठेवता आणि कितीही सामान्य माणसाचा प्रश्न असला तरी तेवढ्याच पोटतिडकीने लढणारे असे ते नेते होते. कोल्हापूर टोलसारखे मोठमोठे विषय मार्गी लावणारे आणि सर्वसामान्य माणसांसाठी लढणारे एक मोठे नेतृत्व एन. डी. पाटील यांच्या निधनाने गमावले आहे. त्यांच्या संघर्षाचा वसा तरूण पिढीने पुढे चालविला पाहिजे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे.

ते म्हणाले की, आम्ही विरुद्ध विचारांचे असूनही एन. डी. पाटील यांना आपल्याबद्दल आत्मीयता होती. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते आघाडीवर होते. मंत्री असूनही आपण या आंदोलनाला साथ दिली आणि सामान्य माणसाच्या हितासाठी हा टोल हटविणे आवश्यक असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिले होते.

त्यांनी सांगितले की, एन. डी. पाटील यांचे घर म्हणजे सर्वसामान्य माणसाने हक्काने जाण्याचे आणि आपली समस्या सांगण्याचे ठिकाण होते. भाजपाचे सरकार असताना एन. डी. पाटील यांनी आपल्याकडून अनेक सामान्य माणसांचे प्रश्न सोडवून घेतले. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या विषयाचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या सूचनेनुसार भाजपा सरकारच्या काळात ऊर्जामंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या हिताचे दोन चांगले निर्णय झाले होते. सर्वसामान्य लोकांप्रमाणे विविध क्षेत्रातील जाणकारही त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत असत आणि मार्गदर्शन घेत असत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.