Pune : चमकोगिरी करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांचा इशारा

एमपीसी न्यूज – उठसूट कोणीही शहराच्या दर्शनी भागात फ्लेक्स लावून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेषतः यामध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. भलामोठा फ्लेक्स लावायचा, त्यावर पंतप्रधान मोदी यांचे छोटे आणि उत्साही नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मोठे फोटो लावण्यात येतात. हे आगामी काळात चालणार नसल्याचा थेट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्याला शिस्त आहे. प्रसारमाध्यमांकडे न जाता आपआपसातील वाद आपल्यातच चर्चा करून मिटवा, असे आवाहनही पाटील यांनी केले. 2022 ची महापालिका निवडणूक लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी भाजपचे चिन्ह, नेत्यांचे फ्लेक्सवरून फोटोच गायब केले आहे. स्वत:चीच प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचीही पाटील यांनी दाखल घेतली असल्याची कुजबुज आहे.

ही निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार असल्याचे भाजपच्या अनेक नगरसेवकांनी काँगेस – राष्ट्रवादीत जाण्यासाठी ‘घरवापसी’ सुरू केल्याचे सांगण्यात येते. 2017 मध्ये भाजपचे पुणे महापालिकेत 98 नगरसेवक निवडून आले होते. आगामी महापालिका निवडणुकीतही 95 ते 100 नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, खासदार गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.