Pune : ‘बकरी ईद’ निमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – बकरी ईद निमित्त विविध मार्गांवरून गोळीबार मैदान कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौका दरम्यानची वाहतूक सकाळी साडेसहा पासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

बकरी ईद निमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गोळीबार चौकातून स्वारगेट कडे जाणारा मार्ग नमाज पठणाचा वेळी बंद राहील तसेच सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ढोले पाटिल चौकाकडून गोळीबार मैदानाकडे तर सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकात येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदान कडे जाणारा मार्ग बंद असेल.

भैरोबा नाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे बंद करून एक्सप्रेस गार्डन व लुल्लानगर कडे वळविण्यात येईल कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणारी सर्व वाहतूक जड मालवाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी व पीएमपी बसला मनाई करण्यात आली आहे. या चौकातून वाहनांना लुल्लानगर चौकातून भैरोबा नाला चौकाचौकातून इच्छित ठिकाणी जाता येईल अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.