Charholi :  चोविसावाडीत कचरा संकलन केंद्र करु नका; चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

एमपीसी न्यूज – चोविसावाडी चऱ्होली येतील तनिष ऑर्चिड फेज -2 , डेस्टिनेशन ओसियान या सहकारी गृह रचना संस्थेच्या बाजूला लोक वस्तीमध्ये नियोजित असणारे कचरा संकलन केंद्र करु नये अशी मागणी ; चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चोविसावाडी चऱ्होली येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या या आरक्षित जागेवर कचरा संकलन केंद्र चालू करण्याचे प्रयोजित आहे. या कचरा संकलन केंद्राच्या शेजारीच तनिष ऑर्चिड फेज -1, तनिष ऑर्चिड फेज -2, डेस्टिनेशन ओशियान, ग्लोबल हाईट या आणि इतर सहकारी गृह रचना संस्था आहेत. हा सर्व रहिवासी परिसर असून या  भागामध्ये 30 पेक्षा जास्त सहकारी गृहरचना संस्था आहेत आणि दहा ते पंधरा हजार सोसायटीधारक या ठिकाणी राहतात.

Maval LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये पावणे तीन लाख मतदार वाढले, वाढीव मतदार कोणाच्या पथ्यावर?

आपल्या या प्रायोजित कचरा संकलन केंद्रामुळे या भागामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना विविध प्रकारच्या समस्याला सामोरे जावे लागू शकते. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीचे आजार पसरवू शकतात ,त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वाहनांची जास्त प्रमाणात ये जा वाढून या भागातील सर्व सोसायटीधारकांना याचा खूप मोठे प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यामुळे रहिवासी भागामध्ये कचरा संकलन केंद्र करण्यास आमच्या फेडरेशनचा पूर्वीपासूनच विरोध आहे.

त्यामुळे कचरा संकलन केंद्राचे काम ताबडतोब थांबवून येथील कचरा संकलन केंद्र हे ज्या ठिकाणी रहिवासी भाग नाही, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात नागरिक राहत नाहीत अशा ठिकाणी हलवावे ही विनंती. अन्यथा या भागातील सर्व सोसायटीधारकांना एकत्र घेऊन आपल्या महानगरपालिके विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.

महानगरपालिकेकडून चऱ्होली येथील चोविसावाडी या लोकवस्तीच्या ठिकाणी कचरा संकलन केंद्र चालू करण्याचे काम चालू करण्यात आले आहे. आमच्या फेडरेशनची पूर्वीपासूनच भूमिका आहे की, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकारी गृह रचना संस्था आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे अशा ठिकाणी कचरा संकलन केंद्र करण्यास आमचा विरोध आहे. एक तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कचरा आमच्याच भागात मोशी येथे कचरा डेपो मध्ये टाकला जातो आणि परत आमच्याच चऱ्होली  या भागात अशा प्रकारचे कचरा संकलन केंद्र उभारणे हा म्हणजे आमच्यावरती अन्याय आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हे काम त्वरित थांबवावे अन्यथा याबाबत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

संजीवन सांगळे, अध्यक्ष , चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.