Charholi : माजी आमदार अशोकराव तापकीर यांचे निधन

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व हवेलीचे माजी आमदार अशोक कल्याणराव तापकीर (वय ७०) यांचे काल (मंगळवारी) रात्री आठच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

अशोकराव तापकीर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे ते बंधू होत. ब्रेन हॅमरेज आणि अर्धांगवायूच्या आजाराशी ते अनेक वर्षे झुंजत होते. अशोकराव तापकीर यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी ११ वाजता चऱ्होली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अशोकराव तापकीर हे हवेली विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. १९८५ ते १९९० या काळात त्यांनी विधानसभेत पिंपरी-चिंचवडसह हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. एक तरुण, कर्तबगार, अभ्यासू आमदार असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. उत्तम वक्तृत्वाने त्यांनी अनेक सभा गाजविल्या होत्या.

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्यातील कामगार संघटनेच्या माध्यमातून ते राजकारणात आले. सामान्य माणसाच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. प्रत्यक्ष गरजूंपर्यंत जावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे लागे. काही गोष्टींचा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागत असे. एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण झालाच पाहिजे, असा त्यांचा स्वतःसाठी दंडक होता. तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाणांशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते. पूर्व हवेलीतील बारा गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी जागतिक बँकेच्या सहाय्याने निधी मिळविला. बोऱ्हाडेवाडी येथील नळपाणीपुरवठा योजनाही त्यांच्याच प्रयत्नांनी झाली.

तत्कालीन पुणे जिल्ह्याचे नेते शंकरराव बाजीराव पाटील आणि कै.अण्णा साहेब मगर यांचे त्यांना सान्निध्य लाभले होते. इंटकच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीतही योगदान दिले. महाराष्ट्र सहकारी साखर कामगार संघटनेचे ते उपाध्यक्ष होते. बालभारती कर्मचारी संघटनेचेही ते सल्लागार होते.

त्यांचा अर्थशास्त्राचा चांगला अभ्यास होता. आमदार असताना महाराष्ट्राच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे ते अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दिवंगत गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामीण भागात सिंचनाचे कार्यक्रम हाती घेतले होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. भारत सरकारने त्यांची युको बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती केली होती. अडचणीत आलेल्या युको बँकेला सावरण्यासाठी त्यांच्या कार्यकालात त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.

काँग्रेसचा एक सच्चा, तळमळीचा व अभ्यासू कार्यकर्ता व आपला खूप जवळचा मित्र हरपल्याची भावना ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केली.

एक अभ्यासू, दिलदार वृत्तीचे, संवेदनशील मनाचे प्रामाणिक नेतृत्व अनेक वर्षे प्रवाहापासून अलिप्त राहिले. सामान्य माणसासाठी त्यांच्या अंतःकरणात कायम ओलावा असे, तळमळ असे. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. असा मनओल्या हृदयाचा आणि सच्चा दिलाचा एक कर्तबगार नेता काळाने हिरावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी आदरांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.