Charholi News: कोरोनाचा वाढता प्रसार! च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडीत आजपासून तीन दिवस कडकडीत बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट असलेल्या च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी आजपासून शनिवारपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. मेडिकल आणि दवाखाने  वगळून तीन दिवस संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाला एक हजार ते बाराशे नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 72 हजार 476 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी या ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सुरुवातीपासून या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

आजपर्यंत सुमारे 500 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांचेही प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडीत आजपासून तीन दिवस शनिवारपर्यंत कडकडीत बंद असणार आहे. या काळात फक्त मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने, व्यवसाय, दूध विक्री, भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. बंदमध्ये शिस्तीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

”कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या भागातील आजपर्यंत सुमारे 500 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अनेक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. च-होलीतील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रसार वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. आजपासून पूर्णपणे बंद पाळण्यात येत असल्याचे” माजी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.