Charholi News : नगरपरिषदेचे मैला मिश्रित सांडपाणी उघड्यावर; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

 एमपीसी न्यूज: चऱ्होली येथील काळे कॉलनीत गेल्या दोन वर्षांपासून उघड्यावरच मैला मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे सांडपाणी खासगी जागेतून वाहत असल्याने स्थानिक जागा मालकाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेच्या वतीने आळंदीच्या उपनगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना निवेदन दिले आहे. या वेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आळंदी शहर सचिव रवी भेंनके, भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळे उपस्थित होते.

याआधी 2018 मध्ये मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने नगराध्यक्षा वैजंता उमरगेकर व तत्कालीन मुख्याधिकारी समीर भूमकर यांचे याच प्रश्नी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्यावेळी खासगी जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी नंतर बंद करण्यात आले होते.

मात्र, अद्यापही उघड्यावरून मैला मिश्रित पाणी वाहत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भिंती ओल्या झाल्या असल्याचे स्थानिक नागरिक सदाशिव जाधव, प्रकाश काळे व संगिता जोगदंड यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविले आहे.

उघड्यावरून मैला मिश्रित पाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे मैला मिश्रित पाणी प्रकाश काळे यांच्या खासगी जागेत सोडण्यात आले आहे. बाजूलाच दोन तीन सोसायट्यांचे काम चालू असून पुढील काळात त्यांचेही मैला पाणी यात येऊ शकते. तसेच दुस-या बाजूला किड्स पॅराडाईज शाळा असल्याने, तेथील मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरपरिषदेच्या वतीने सचिन गायकवाड यांनी नुकतीच येथील परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजंताताई उमरगेकर यांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.