Charholi : चहोली, डुडूळगावमध्ये पीएमपीएलचा बसडेपो

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बस डेपो च-होली आणि डुडूळगाव येथे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हस्तांतरीत करण्यात आली आहे. तसेच चिखलीत पासकेंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.  प्रायोगिक तत्वावर पासकेंद्र येत्या शुक्रवार (दि. 16) पासून सुरू करण्यात येणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) हे पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्ही महापालिका हद्दीपासून 20 किलोमीटर परिघ क्षेत्रासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवित आहे. पीएमपीएलमध्ये सद्यस्थितीत 1450 बस व भाडेतत्वावरील 662 बस अशा मिळून एकूण 2112  बसगाड्यांचा ताफा आहे. या बसगाड्यांची पार्कींगची सोय, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी बसडेपोची गरज असते. पीएमपीएलकडे पुणे महापालिका हद्दीत सात, तर पिंपरी-चिंचवड हद्दीत तीन असे एकूण 10 बस डेपो आहेत. बसगाड्यांच्या सद्याच्या संख्येच्या प्रमाणात दहा बसडेपोतील जागा खुपच अपुरी पडत आहे. त्यातच अंदाजे 500 नवीन बसचा ताफा पीएमपीएलमध्ये सामील होणार आहे. या सर्व बस पार्किंगसाठी पीएमपीएलकडील जागा अपुरी पडत आहे.

त्यामुळे शेकडो बसचे पार्किंग रस्त्यावरच केले जात आहे. त्यातूनच बसच्या विविध पार्ट्सची चोरी, तसेच नुकसान होऊन अर्थिक भार वाढत आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेकोनातून सर्व बसचे पार्किंग संरक्षित जागेमध्ये होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखभाल-दुरूस्तीसाठीही जागेची गरज असून त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. तशी जागेची मागणीही पीएमपीएलतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यानुसार च-होली येथील सर्व्हे नंबर 129 व 130  मधील साडेतीन एकर आणि डुडूळगाव जकात नाक्याची एक एकर जागा पीएमपीएलकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. ही जागा तीस वर्षांच्या कालावधीसाठी पीएमपीएलकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी बस डेपो किंवा बसस्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागरीकांच्या मागणीनुसार चिखली येथे प्रायोगिक तत्वावर पासकेंद्र येत्या शुक्रवार (दि. 16) पासून सुरू करण्यात येत आहे. चिखली भागातील नागरीक, कामगार, महिला, तसेच विद्यार्थी, व्यावसायिक यांच्याकडून पासकेंद्राची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे पासकेंद्र सुरू करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणा-या या पासकेंद्राची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी दोन अशी असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.