Pune : धर्मादाय संस्थांच्या ऑडीटला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

एमपीसी न्यूज : राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना त्यांचे वार्षिक लेखापरिक्षण अहवाल (ऑडीट रिपोर्ट) सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी यांनी सर्व संस्थांना एक महिन्याची मुदतवाढ देण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेक संस्थांना कामकाज करता आले नव्हते. परिणामी वार्षिक हिशोबपत्रे तयार करता आली नाहीत. धर्मादाय संस्थांना दरवर्षी जमाखर्चाचा ताळेबंद 31 मार्चअखेर सादर करणे बंधनकारक आहे. वार्षिक ताळेबंद धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा सुरू झाली आहे.

ताळेबंद अपलोड केल्यानंतर त्याचा पोचपावती आणि मूळ ताळेबंद ज्या त्या जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तालयांमध्ये जमा करणे बंधनकारक आहे. अनुसूची 9 ड नुसार सर्व विश्वस्त सदस्यांचे पॅनकार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच ट्रस्टला मिळणाऱ्या अनुदान, देणग्यांबाबतचे सर्व स्त्रोत देणे तसेच लेखापालांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असते.

प्राप्तीकर विभागानेही वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाल्यामुळे ज्या संस्थांना त्यांचे वार्षिक अहवाल, हिशेबपत्रे, लेखापरिक्षण अहवाल सादर करणे शक्य झाले नाही. त्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने त्यांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.