Chakan : पाठलाग करून गुटख्याचा टेम्पो पकडला; सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

टेम्पोसह दोन जण ताब्यात; चाकण पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक महामार्गाने एका टेम्पोत पोत्यात भरून नेण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा आणि टेम्पोसह सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) जवळील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या समोर पाठलाग करून करण्यात आली आहे. एका पोलिसाला गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनंतर संबंधित टेम्पोचा चाकणमधील आंबेठाण चौकापासून पोलिसांनी पाठलाग केला असता त्या टेम्पोमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मिळून आला आहे. 

विमल पान मसाला, सुगंधी सुपारी व तंबाखू गुटखा व एक टेम्पो असा सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांना ताब्यात घेऊन सायंकाळी चाकण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाला रात्री उशिरा याबाबतची माहिती देण्यात आली असून गुटख्याची मोजदाद सुरु करण्यात आली आहे.

टेम्पो चालक अबुजार जमालउद्दीन शेख (रा. वसई, मुंबई) व अरुण रावसाहेब खोत      (वय ३२, सध्या रा, बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. कासेगाव पंढरपूर), अशी या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या गुटख्याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, अजय भापकर, ज्ञानेश्वर सातकर, शेखर कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात सापळा लावून पळून जाणारा टेम्पो अडवून ही कारवाई केली आहे. चाकण परिसरात मागील वर्षभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून या गोरखधंद्याची पाळेमुळे खोदण्याची गरज निर्माण झाली आहे.

पक्की खबर; टेम्पोचा पाठलाग :

प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून पुणे जिल्ह्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक अजय भापकर यांना खबऱ्याकडून मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकात सापळा लावला.

मात्र, टेम्पो चालकाने चौकातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित टेम्पो भाग्यलक्ष्मी कार्यालयाच्या समोर पकडला असता त्यात गुटखा मिळून आला. तीन महिन्यांपूर्वी (13 जुलै 2018) सुद्धा पोलीस नाईक भापकर यांनीच गोपनीय माहिती मिळवून 17 लाखांचा गुटखा पकडून दिला होता. चाकणमध्ये मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवाईत सुमारे अडीच कोटींचा गुटखा मिळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.