Wakad : शिवसेना पदाधिका-यावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – तुमचे अनधिकृत बांधकाम प्राधिकरण अतिक्रमण विभागाला पाडू देणार नाही, असे सांगून चौघांकडून एक लाख 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर शुक्रवारी (दि. 30) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज भगवान दाखले (रा. रहाटणी), असे गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना पदाधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी स्मिता संजय देसाई (वय 37, रा. इंद्रायणीनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे इंद्रायणीनगर थेरगाव येथे जुने घर होते. ते घर पाडून त्यांनी आरसीसी बांधकाम करण्यास घेतले होते. दरम्यान दाखले हा त्याठिकाणी आला. तुमचे अनधिकृत बांधकाम आहे, मात्र मी शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने प्राधिकरणच्या अतिक्रमण विभागाला ते पाडू देणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी फिर्यादी यांच्यासह इतर तिघांकडून प्रत्येकी 30 हजार असे एकूण एक लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर अतिक्रमण विभागाने घरांवर कारवाई केल्याने फिर्यादीसह इतरांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.

युवराज दाखले म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी पिंपरी मतदारसंघातून लढण्याची तयारी करीत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मी वारंवार आवाज उठवला आहे. हे काम करीत असताना अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि खोट्या संघटनांच्या पुढाऱ्यांच्या मनात माझ्याविषयी राजकीय वैमनस्य आहे. या पार्श्वभूमीवर मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव संबंधित अधिकारी आणि संघटनेच्या पुढाऱ्यांकडून आखण्यात आला आहे. स्मिता देसाई यांचे पती संजय देसाई यांनी बांधकाम परवानगी मिळावी यासाठी सहकार्य करावे म्हणून स्वतःहून माझ्याकडे येऊन काही पैसे देऊ केले होते. मी माणुसकीच्या दृष्ट्टीकोनातून त्यांना मदत करण्यासाठी होकार दिला होता.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.