Pune News : किरकोळ वादातून हॉटेलमध्ये आचाऱ्याची हत्या, एकाला अटक

एमपीसी न्यूज : बारामती मध्ये एका हॉटेलमध्ये स्वयंपाक घरात ये-जा करण्यावरून झालेला वाद एका आचाऱ्याच्या जीवावर बेतला. सहकाऱ्याकडूनच चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली. बारामती पासून जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. खून केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. 

गणेश प्रभाकर चव्हाण असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. मयत व्यक्ती हा नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार असल्याचे देखील आता समोर आले आहे. तर आरोपी विकास दीपक सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे बारामती शहरापासून जवळच असलेल्या मातोश्री हॉटेलमध्ये स्वयंपाक करण्याचे काम करीत होते. गणेश चव्हाण हा भाज्या बनवायचा तर आरोपी रोट्या बनवण्याचे काम करत होता. गुरुवारी रात्री नॉनव्हेज बनवण्या वरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले होते. त्यावेळी हॉटेल मालकाने मध्यस्थी करत हे भांडण मिटवले होते. परंतु शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास सिंग याने पोटात चाकू खुपसून गणेश चव्हाण यांचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.