IPL 2021 : “गुरू” धोनीच, अखेर गुरू धोनी त्याच्या चेला पंतवर पडला भारी

चार विकेट्सने दिल्लीला हरवत चेन्नईची अंतिम फेरीत केला प्रवेश.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) पंतच्या दिल्ली संघाने चेन्नईला मोक्याच्या क्षणी अडचणीत आणले खरे, पण या अपमानाने पेटून उठलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कठीण प्रसंगी धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती समर्थपणे पार पाडत आजही महेंद्र का सिंग आहे हे सप्रमाण सिद्ध करत संघाला रोमहर्षक विजयासह अंतीम फेरीत सुखरूप पोहचवले.

आयपीएल 2021 च्या दुबई येथील मैदानावर झालेल्या या पहिल्या कॉलीफाय सामन्यात महेंद्रसिंगने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. योगायोग म्हणजे धोनीने आयपीएलमध्ये आज 150 वा टॉस जिंकला. चेन्नईने आजच्या सामन्यात एकही बदल केला नाही. तर दिल्ली संघाने टॉम करनला रिपल पटेलच्या जागेवर अंतीम 11 मध्ये स्थान दिले. गुरू आणि शिष्याच्या या लढाईकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहीले होते.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या संपूर्ण मोसमात भरात असलेल्या दिल्लीच्या जोडीने आजही सलामी जोरदार सलामी दिली, धवनपेक्षा शॉ चांगल्या लयीत खेळत होता, धवनचे आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध चांगले प्रदर्शन असते आज मात्र तो विशेष चमकू शकला नाही, आणि हेजलवूडच्या गोलंदाजीवर केवळ 7 धावा काढून धोनीच्या हातात झेल देऊन बाद झाला.

पण दोघांनी केवळ 20 चेंडूतच 36 धावा जोडल्या होत्या.धवन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर खेळायला आला.पण आज काही त्याचा दिवस चांगला नव्हता,8 चेंडूत 1 धाव काढून तो खराब फटका मारून हेजलवूडचीच शिकार झाला.

त्यामुळेच पहिल्या पॉवरप्ले मध्ये शॉच्या जबरदस्त खेळानंतरही दिल्ली कॅपिटल्सची अवस्था सहा षटकात दोन बाद 51 होती. लय सापडलेल्या पृथ्वीने मात्र जबरदस्त शो करत 27 चेंडूतच आक्रमक अर्धशतकी खेळी पूर्ण करताना तीन षटकार आणि सहा चौकार मारले हे त्याचे आयपीएल मधले दहावे अर्धशतक होते.

दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली नाही, आज पंतने स्वतःऐवजी चक्क अक्षर पटेलला बढती दिली पण तो सुद्धा स्वस्तात बाद झाला आणि थोड्याच वेळात 34 चेंडूत 60 धावा करून पृथ्वी शॉ उंच फटका मारण्याचा नादात जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यावेळी दिल्ली कॅपिटल्सची अवस्था चार गडी बाद 80 होती आणि त्यातल्या 60 धावा एकट्या शॉच्या होत्या. त्यानंतर आलेल्या हेटमायर आणि पंतने पाचव्या गड्यासाठी 83 धावांची चांगली भागीदारी केली, धावा काढणे अवघड ठरत होते पण दोघेही समजदारीने खेळत होते. 19 व्या षटकात हेटमायर ब्रावोला उंच फटका मारण्यच्या नादात 24 चेंडूत 37 धावा काढुन जडेजाच्या हातात झेल देऊन बाद झाला.

पंतने शेवटच्या षटकात काही रन नाकारून सगळ्यानाच बुचकाळ्यात टाकले, पण अखेरच्या तीन चेंडूवर सात धावा काढून आपले वैयक्तिक 15वे अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये एका हाताने मारलेले 3 षटकार आणि तीन चौकार होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आपल्या 20 षटकात 172 धावा काढुन चेन्नईच्या संघाला 173 धावांचे लक्ष दिले.

चेन्नईकडून हेजलवूडने 2 तर जडेजा, मोईन अली आणि ब्रावोने एकेक बळी घेतला. 15 तारखेला अंतिम फेरीतले स्थान पक्के करण्यासाठी चेन्नईला 173 धावांचे लक्ष गाठण्यासाठी सुरूवात चांगली मिळायला हवी होती, पण नॉर्कीयाने एका वेगवान चेंडूवर डूप्लेसीला वैयक्तिक एकाच धावेवर त्रिफळाबाद करुन पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला.

पण त्याच्या जागी आलेल्या रॉबिन ऊथप्पाने आत्मविश्वास दाखवत पहिल्याच चेंडूवर अप्रतिम कव्हरड्राईव्ह मारत आपले खाते उघडले. त्यानंतर त्याने काही अप्रतिम फटके मारत धावा जमवत चेन्नईच्या डावाला स्थैर्य दिले. पहिल्या पॉवरप्ले मध्ये चेन्नईने 59 धावा एक गडी गमावून काढल्या, ज्यात रॉबिनच्याच 24 चेंडूतल्या 40 धावा होत्या, ज्यात दोन उत्तुंग षटकार आणि 5 चौकार होते.

अशा लयीत असल्याने त्याने आयपीएलमधले 25 वे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने त्याला ऋतूराजने सुद्धा चांगली साथ दिली. 110 धावांची भागीदारी झाल्यानंतर रॉबिनची अप्रतीम पारी श्रेयस अय्यरच्या अप्रतिम झेलामुळे समाप्त झाली.

टॉम करनने रॉबिनला 63 धावांवर बाद केले, पण याने जराही विचलित न होता ऋतूराजने शांतचित्ताने खेळत आपली आयपीएलमधली सातवी आणि या हंगामातली चौथी अर्धशतकी खेळी पूर्ण केली. धोनीचे निर्णय प्रेक्षकांसह समालोचकाना नेहमीच अचंबीत करतात, आजही त्यानें चौथ्या नंबरवर शार्दुल ठाकूरला पाठवले ते का हे समजण्या आधीच टॉम करनने त्याला बाद करून दिल्लीला सामन्यात वापस आणले.

या निर्णयाने हिंदी समालोचन करणारा सुनील गावसकर खूपच आश्चर्यचकित झाला होता. काही क्षणापूर्वी चेन्नई ऋतुराज आणि रॉबिन खेळत असताना सहज जिंकेल असे वाटत होते, पण अचानक विकेट्स पडल्याने चेन्नईची गडबड उडाली, आणि श्रेयस अय्यरने अप्रतिम थ्रो करून अंबाती रायडूला धावबाद करून सामन्यात रंगत आणली. रॉबिन ऊथप्पाचा घेतलेला झेल चिरकाल स्मरणात राहील असाच होता.

तेंव्हा चेन्नईला विजयासाठी 5 षटकात 52 धावा हव्या होत्या.त्यातच जम बसलेला ऋतूराज पण 70 धावा काढून बाद झाला यावेळी दिल्ली संघांला विजय खुणावू लागला खरा पण इथेच पंतचा अनुभव कमी पडला आणि याचाच फायदा उठवून महेंद्रसिंग धोनीने   समजबुझ आणि आक्रमकता दाखवत सामना पंतच्या हातातुन शब्दशः खेचून घेतला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

14 व्या हंगामात 9 व्या वेळी चेन्नई अंतीम फेरीत पोहचले आहे. रबाडाचे एक षटक शिल्लक असतानाही त्याला गोलंदाजी न देणे पंतच्या संघाला आज तरी खुप महागात पडले असले तरी त्याला अजूनही एक संधी आहे, उद्या केकेआर विरुद्ध आरसीबी मधल्या विजेत्यांसोबत पुन्हा एकदा त्यांना अंतीम फेरीत जाण्यासाठी लढायची संधी मिळणार आहे.

चेन्नई कडून ऋतुराजने सर्वाधिक 70 , रॉबिनने 63 तर धोनीने केवळ सहा चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत केलेल्या वेगवान 18 धावा विजयासाठी मोलाच्या ठरल्या.पण उत्तम खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ऋतूराजच पुन्हा एकदा विजयाचा आणि त्यामुळेच सामन्याचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.