IPL 2021: बातमी आयपीएलची – रोमहर्षक सामन्यात कोलकाताला हरवत चेन्नईने केली विजयाची हॅटट्रिक

दीपक चहरने केला कहर

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएल 2021 च्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या आयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि कदाचित इथेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा लादलेला निर्णय सुसंधी समजून धमाकेदार सुरुवात केली, धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार का आहे हे अनेक मोठमोठ्या क्रीडा समीक्षकांनी सांगितलेले आहेच, त्याला पुन्हा उगाळून वेळ घेणार नाही तुमचा, पण कुठल्याही परिस्थितीत विचलीत न होणे, याबरोबरच त्याचा आणखी एक मोठा गुण आहे तो म्हणजे चांगल्या खेळाडूंना पाठिंबा देणे, म्हणूनच लागोपाठ तीन सामने अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला त्याने विश्वास देत आज पुन्हा एक संधी दिली आणि या कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणारी खेळी आज तो खेळून गेला.

त्यात आयन मॉर्गनने चक्क त्याच्याविरुद्ध स्पिनने सुरुवात केली आणि या संधीचे सोने करत ऋतुराजने या मोसमातले आपले पहिले आणि आक्रमक अर्धशतक नोंदवून कर्णधाराच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने फ्लाप डूप्लेशीसोबत केवळ 12 षटकातच शतकी भागीदारी नोंदवताना केवळ 42 चेंडूत 64 धावा ठोकताना सहा आकर्षक चौकार आणि चार षटकारही ठोकले.

संघाच्या 112 धावा असताना ऋतुराज, वरुण चक्रवर्तीचा शिकार झाला. यानंतर आलेल्या मोईन अलीने मागच्या सामन्यातला धडाका चालू ठेवत केवळ 12 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारत 25 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूने डूप्लेशी सुद्धा जबरदस्त खेळी करत होता. केवळ नशिबाने साथ न दिल्याने त्याचे आजचे शतक हुकले असले तरी  केवळ 60 चेंडूत नाबाद  95 धावा करताना त्याने नऊ चौकार तर 4 गगनभेदी षटकार मारले, या खेळीमुळेच चेन्नई संघाने निर्धारित 20 षटकात केवळ चार बळी गमावत 220 धावांचे मोठ लक्ष कोलकाता नाईट रायडर्स पुढे ठेवले.

अकरा धावा षटकामागे काढायचे मोठे लक्ष घेवून उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अतिशय खराब झाली, युवा शुभमन गील शून्य तर नितीश राणा 9 धावा काढून बाद झाले.

दीपक चहरने अतिशय घातक गोलंदाजी करत अगदी सुरुवातीलाच कोलकाता संघाला खिंडार पाडले. त्याने सलामीच्या जोडीसह सुनील नारायण आणि कर्णधार मॉर्गनला बाद करत कोलकाताची अवस्था चार बाद  31 केली आणि याच धावसंख्येवर लुंगी इंगिडीने राहुल त्रिपाठी ला बाद करत कोलकाताची अवस्था पाच गडी बाद 31 अशी बिकट केली.

आता कोलकाता संघ नक्कीच मोठ्या फरकाने हारणार असे वाटत असतानाच माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी डाव सावरताना आक्रमण हाच उत्तम मार्ग मानून चेन्नईच्या गोलंदजीला धोपटणे सुरू केले.यात रसेल फारच खतरनाक झाला होता. त्याने केवळ 22 चेंडूत 54 धावा करताना 6 उत्तुंग षटकार आणि तीन चौकार मारले.

दिनेश कार्तिकने सुद्धा त्याचाच कित्ता गिरवताना  24 चेंडूत 40 धावा ठोकल्या. मात्र हे दोघे संघाला विजयाची आशा दाखवून मध्येच सोडून गेले. सारे काही संपले असे वाटत असतानाच आज गोलंदाजीमध्ये महागडा ठरलेल्या आणि लिलावातही कोलकाताने जबर किंमत मोजून घेतलेल्या पॅट कमिन्सने तुफानी फलंदाजी करताना  सहा उत्तुंग षटकार मारत केवळ 34 चेंडूत नाबाद 66 धावा करताना चेन्नईला नाकीनऊ केले.

पण इथेच धोनी कर्णधार म्हणून वरचढ ठरला त्याने दुसऱ्या बाजूने कोलकाता संघाच्या एकेक विकेट बुद्धी वापरून काढल्या. सॅम करन आणि ठाकूरला जोरदार झोडपत एकवेळ तर कमिन्स एकटाच चेन्नईला हरवेल असे वाटत होते, मात्र दुसऱ्या बाजूने योग्य साथ न मिळाल्याने त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि चेन्नई संघाला 18 धावांनी विजय मिळाला जो त्यांचा सलग तिसरा विजय होता आणि अंकतालिकेत त्यांना प्रथम क्रमांकावर  सुद्धा घेऊन आला.

सुरुवातीलाच चार विकेट्स मिळवणाऱ्या चहरला लुंगी एंगीडीने तीन बळी मिळवून भारी साथ दिली. आणि चेन्नई एक्सप्रेसचा विजयाचा वेग वाढायला लागला. शतकाइतकीच किंबहुना त्याहूनही मौल्यवान नाबाद 95 धावांची खेळी करणारा फ्लाप डूप्लेशी सामनावीर ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.