IPL 2021 : आयपीएल 2021 च्या झळाळत्या कपासाठी केकेआरविरुद्ध चेन्नई सामना रंगणार

रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात अविस्मरणीय षटकार मारत दिल्लीला तीन गडी राखून हरवले

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आयपीएल 2021 च्या झळाळत्या कपासाठी केकेआरच चेन्नईविरुद्ध लढण्यासाठी है तैय्यार. रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात अविस्मरणीय षटकार मारत दिल्लीला तीन गडी राखून हरवले. राहूल त्रिपाठीने दिल्लीचा प्रवास केला खतम.

आधी मजबूत परिस्थितीत असणाऱ्या कोलकाता संघाच्या महत्वाच्या क्षणी विकेट्स पडल्याने सामना अचानक दिल्ली कडे झुकला होता. त्यातच रबाडा,नोर्कियाने आणि अश्विनने सुद्धा ऊत्तम गोलंदाजी करताना केकेआरला प्रचंड दडपणाखाली आणले होते पण राहुल त्रिपाठीने जबरदस्त फलंदाजी करून संघाला विजयी तर केलेच पण चेन्नईला सुद्धा जणू तैय्यार हे हम म्हणत धोक्याचा इशारा ही दिला. आयपीएल 2021 मधला हा एक अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचा सामना म्हणून नक्कीच गणला जाईल.

पंधरा तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नई सोबत लढण्यासाठी दुसरी टीम कोण असणार याचा फैसला करणाऱ्या आजच्या शारजा येथील या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआरच्या बाजूने लागताच त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली कॅपिटल्सने आज टॉम करन ऐवजी मार्कस स्टोयनिसला अंतिम अकरा मध्ये समाविष्ट केले तर केकेआरने मागच्या विजयी संघात काहीही बदल केला नाही. पृथ्वी शॉ आणि धवनने सलामीला खेळताना चार षटकात 32 धावा जोडल्या असतानाच पृथ्वी शॉ वैयक्तिक 18 धावावर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद झाला.

दिल्ली कर्णधाराने त्याच्यानंतर फलंदाजीसाठी स्टोयनिसला बढती दिली. पण त्याला संघाला अपेक्षित असलेली आक्रमकता काही दाखवता आली नाही. आणखी 39 धावा जोडून स्टोयनिस शिवम मावीचा या सामन्यातला पहिला बळी ठरला. त्याने 18 धावा करण्यासाठी 23 चेंडू खर्च केले.

त्यानंतर मात्र पंतने नियमित फलंदाज श्रेयस अय्यरला पाठवले. दुसऱ्या बाजुने शिखर धवन मात्र आज चांगले खेळत होता. तो बऱ्यापैकी लयीत वाटत असल्याने मोठी धावसंख्येकडे दिल्लीची वाटचाल चालू होती, पण वरुण चक्रवर्तीने त्याला वैयक्तिक 36 धावांवर बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला.

15 व्या षटका अखेरीस दिल्लीच्या तीन गडी बाद 83 धावा झाल्या होत्या. दुबई किंवा अबुधाबीच्या मैदानाच्या तुलनेत शारजा मैदानावर नेहमीच धावा कमी होतात आणि त्यामुळे सामनेही रंगतदार होतात असा या मैदानाचा इतिहास असल्याने उरलेल्या षटकात दिल्ली आणखी किती धावा जमवेल अशी उत्सुकता सर्वानाच होती. मात्र लोकी फर्ग्युसनने खतरनाक ऋषभ पंतला केवळ सहा धावांवर बाद करून दिल्लीला आणखी एक हादरा दिला.

साखळी सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दिल्ली संघाला महत्वाच्या वेळी खेळ उंचावता येत नाही हे मागच्या वर्षीच्या अंतीम सामन्यात आणि परवाच्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिसून आले होतेच आजही त्यांची तशीच अवस्था झाली. आणि श्रेयस अय्यर सारखा फलंदाज असूनही दिल्लीला फारशा धावा वाढवता आल्या नाही.

शिमोन हेटमायरला डीआरएसवर मिळालेले जीवदान पण काही लाभदायक ठरले नाही आणि तो 17 धावा काढून धावबाद झाला. तरीही श्रेयस अय्यरच्या उपयुक्त नाबाद 30 धावांमुळे  दिल्लीच्या निर्धारित 20 षटकात 135 धावा झाल्या. कोलकाता कडून वरुण चक्रवर्तीने आजही चांगली गोलंदजी करत आपल्या चार षटकात 26 धावा देत दोन गडी बाद केले. तर शिवम मावी आणि फर्ग्युसनने एकेक गडी बाद केला.

अंतिम सामन्यात तीन वेळेस ही स्पर्धा जिंकलेल्या चेन्नईविरुद्ध लढण्यासाठी दोन वेळेस ही स्पर्धा जिंकलेल्या कोलकाताला है तैय्यार म्हणण्यासाठी 120 चेंडूत 136 धावा करायच्या होत्या. शुभमन गील आणि वेंकटेश अय्यर या दोन युवा सलामीवीरांनी केकेआरला या स्पर्धेत बऱ्याचदा चांगली सलामी दिलेली आहे. आजही अशीच अपेक्षा संघाला होती. आणि ती या दोघांनीही पूर्ण केली.

अय्यर गीलपेक्षाही अधिक सुंदर आणि आक्रमक सुध्दा खेळत होता, त्याने रबाडाला एक देखणा आणि उत्तुंग षटकार देखील मारला. या चांगल्या सुरुवातीमुळेच केकेआरने पहिल्या पॉवरप्ले अखेरीस नाबाद 51 धावा जोडल्या होत्या. त्यानंतरही हा धडाका चालूच राहीला. बघताबघता अय्यरने आपले या स्पर्धेतले तिसरे अर्धशतक 38 चेंडूत पुर्ण केले ज्यात तीन चौकार आणि तेवढेच षटकार ही सामील होते.

याचवेळी केकेआरच्या 12 व्या षटकाच्या आतच 90 धावा पुर्ण झाल्या होत्या आणि एकही बळी बाद झाला नव्हता. दुसऱ्या बाजूने शुभमन गीलने त्याला चांगली साथ देत आपली भूमिका चोख पार पाडली होती त्यामुळे केकेआर सहजपणे हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण रबाडाने आपल्या नव्या स्पेलमध्ये गोलंदाजीला येताच जम बसलेल्या अय्यरला 55 धावांवर बाद करून केकेआरला पहिला धक्का दिला.

अय्यर बाद झाल्यानंतर नितीश राणा खेळायला आला,यावेळी केकेआरला जिंकण्यासाठी 42 चेंडूत 37 धावा हव्या होत्या.कोलकाता सहज जिंकेल असे वाटत असतानाच नितीश राणा आणि जम बसेलला शुभमन गील एकापाठोपाठ एक बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली त्यातच रबाडाने आपल्या शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करत दिनेश कार्तिकला शून्यावर बाद करून केकेआरचा चौथा गडी तंबूत पाठवला.

त्या दडपणाखाली केकेआरने चौदा चेंडूत तीनच धावा काढल्या,12 चेंडूत 10 धावा, नंतर सात चेंडूत 7  धावा असे समीकरण असताना कर्णधार मॉर्गनच्या यष्ट्या नॉर्कीयाने उध्वस्त करून सामन्यात जबरदस्त रोमांच निर्माण केला.

अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी सात धावा हव्या असताना दिल्ली कर्णधार पंतने अश्विनला गोलंदाजीसाठी पाचारण केले पहिल्या दोन चेंडूवर एकच धाव देत तिसऱ्या चेंडूवर अश्विनने शकीबला पायचीत करून केकेआरच्या संघात एकच हाहाकार उडवून दिला.

आता तीन चेंडू आणि विजयासाठी सहा धावा असे समीकरण होते आणि केकेआरचे सहा प्रमुख फलंदाज बाद झाले होते, दुर्दैवाने त्रिपाठी सुद्धा स्ट्राईक पासून दूर होता. मागच्या सामन्याचा मानकरी सुनील नारायणने आंधळा फटका मारत आपली विकेट गमावली आणि त्यामुळे अश्विन हॅटट्रिकवर आला आणि त्रिपाठी स्त्राईकवर ,अन…त्याच्या हॅटट्रिकचे आणि दिल्लीच्या विजयाचे स्वप्न भंग करतानाच राहुलने जबरदस्त षटकार मारत केकेआरला अंतीम सामन्यात पोहचवले आणि दिल्ली संघाचा या स्पर्धेतला प्रवासही.

केकेआरने आपल्या हातानेच सोपा विजय अवघड केला होता आणि राहुलच्या उत्तुंग षटकाराने सहजसोपा सुद्धा. दोन बाद 123 अशा मजबूत परिस्थितीतुन ते सात बाद 130 अशा कठिण परिस्थितीतून संघाला विजयी केले ते राहुल त्रिपाठी या शूरविराने दिनेश कार्तिक,मॉर्गन, नारायण आणि शकीब या आंतरराष्ट्रीय महारथीना या कठिण प्रसंगी भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता, यामुळेच दिल्ली ला विजय खुणावू लागलाही होता,पण त्रिपाठीने संयम आणि आक्रमकता यांच्या सुरेख संगमाने केकेआरला अंतिम फेरीत पोहचवले.

पण 55 धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या आणि संघाच्या विजयाचे बॅलन्सशीट अचूक रेखणाऱ्या सनदी लेखापाल असणाऱ्या युवा वेंकटेश अय्यरलाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.