Chhatrapati Shivaji Maharaj : किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 394 वा जन्मोत्सव आज (सोमवारी, दि. 19) उत्साहात संपन्न झाला. शासकीय जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

दरवर्षी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवाचा सोहळा सकाळी दहा वाजता सुरू होतो. मात्र मागील वर्षी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी हा सोहळा सकाळी लवकर घेण्याबाबत सूचना केली होती. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून तसेच विदेशातून शिवभक्त किल्ले शिवनेरी येथे येत असतात. शासकीय सोहळा संपन्न झाल्याशिवाय या शिवभक्तांना किल्ले शिवनेरी येथे प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी ही सूचना केली होती. त्यानुसार यावर्षी सकाळी लवकर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

Pune : येरवडा भागात वाहनांची तोडफोड करत कोयते उगारून टोळक्याची दहशत

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवजन्मोत्सवाचा पाळणा हलवून हा शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. सन 2000 पासून या शासकीय सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे हेलिकॉप्टर मधून दाखल झाले. त्यानंतर ते शिवजन्मोत्सव ठिकाणी पोहोचले. तिथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा झाल्यानंतर ते पालखीच्या ठिकाणी आले. पालखीला वंदन केल्यानंतर पोलीस पथकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. बाल मावळ्यांनी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले.

हा शासकीय सोहळा सुरू असताना शिवनेरीच्या पायथ्याशी अबालवृद्धांनी गर्दी केली. शासकीय सोहळा संपन्न झाल्यानंतर या सर्व शिवभक्तांना शिवनेरी गडावर सोडण्यात आले. दरम्यान, शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवानिमित्त फुलांची आकर्षक सजावट (Chhatrapati Shivaji Maharaj) करण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.