Pune : छोटा राजन व गजानन मारणे टोळीतील गुंड जेरबंद

दोन पिस्टल आणि तीन काडतुसे हस्तगत; गुन्हे शाखा युनिट 3 ची कारवाई

एमपीसी न्यूज – छोटा राजन आणि गजानन मारणे टोळीतील दोघांना युनिट 3 च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई काल रविवारी (दि 12) केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि तीन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

जमीर शेख (वय 26, रा. मुळशी), अजय चक्रनारायण (वय 23, रा. पाषाण), अशी या दोन्ही सराईत गुन्हेगारांची नावे असून जमीर हा गजानन मारणे टोळीशी संबंधीत आहे. तर अजय हा छोटा राजन गँगचा सक्रीय सदस्य आहे. दोघेही पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत.

युनिट तीनचे पोलीस अधिकारी गस्तीवर असताना हवालदार प्रशांत पवार आणि पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना जमीर आणि अजय दोघेही कोथरूड येथील पौडरोड समोरील साई पॅलेस  जवळील रिक्षा स्टॅण्ड जवळ येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी दोघेही संशयित रित्या फिरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळून दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसे असा एकूण एक लाख एकवीस हजार पाचशे रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

जमीर शेखवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दुखापतीचे, विनयभंगाचा, अपहरणाचे असे विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्यांच्यावर आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 16 मे पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.