Chinchwad : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी छोटा राजन सामाजिक संघटनेच्या मावळ तालुका संपर्क प्रमुखासह तिघांना अटक

गुन्हे शाखा युनिट एक ची कारवाई

एमपीसी न्यूज – छोटा राजनच्या सीआर सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुखासह तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांकडून दोन गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

चरण बाळासाहेब ठाकर (वय 26, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय 28, रा. पांगरी, ता खेड) आणि राजू शिवलाल परदेशी (वय 59, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, इंद्रायणी हॉस्पिटल समोर केळगाव रोड आळंदी येथे एक व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी इंद्रायणी हॉस्पिटल समोर सापळा रचून चरण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत त्याला अटक केली. आळंदी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

चरण याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या ओळखीचा प्रदीप खांडगे यांच्याकडून पिस्तूल विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप खांडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून दोन पिस्तूल आणले आहेत. त्यातील एक पिस्तूल चरण याला विकले आहे. तर दुसरे पिस्तूल कुसगाव लोणावळा येथील त्याचा मित्र राजू परदेशी याला विकले आहे. अशी प्रदीप याने माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी राजू परदेशी याला देखील अटक केली. तिघांकडून एकूण 2 पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी चरण ठाकर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच तो कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भारतीय सेनेचा मावळ तालुक्याचा माजी अध्यक्ष आहे. तो सध्या छोटा राजनच्या सी आर सामाजिक संघटनेचा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचे व दारूविक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तर प्रदीप खांडगे याच्यावर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सावन राठोड, अमित गायकवाड, सचिन उगले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.