Chichwad : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पेट्रोल भरण्यासाठी रांगेत या, असे सांगितल्याच्या कारणावरून दोघांनी कर्मचाऱ्यास शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

काशिनाथ उद्धवराव चौधरी (वय 35, रा. नखातेनगर, रहाटणी) असे मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एमएच-14-एयू-6139 या दुचाकीवरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काशिनाथ हे संभाजीनगर येथील एका पेट्रोल पंपावर काम करतात. रविवारी सकाळी दोन तरुण एका दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले. पेट्रोल भरण्यासाठी रांग असतानाही ते थेट पंपाजवळ आले. यामुळे काशिनाथ यांनी त्यांना पेट्रोल घेण्यासाठी रांगत या असे सांगितले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी काशिनाथ यांच्याशी वाद घालत शस्त्राने त्यांच्यावर वार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.